प्रधानमंत्री पिक विमा योजना: पिक नुकसानाची माहिती 72 तासात विमा कंपनीस कळवा

B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : जिल्ह्यात दि. 28 ऑगस्ट ते दि. 2 सप्टेंबर 2024 या कालावधीत मोठ्या प्रमाणात पाऊस सूरू असून अजुन पुढील काही दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पाऊसामुळे विमा संरक्षित क्षेत्र जलमय होऊन पिकाचे नुकसान झालेले असल्यास विमा संरक्षित क्षेत्राला नुकसान भरपाई मिळणेसाठी झालेल्या नुकसानीची पुर्वसुचना संबंधीत विमा कंपनीस ७२ तासामध्ये कळवावी असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.
जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप 2024 या हंगामाकरीता अधिसुचीत क्षेत्रातील अधिसुचीत पिकांसाठी राबविण्यात येत आहे. जिल्ह्यासाठी खरीप 2024 मध्ये ओरियंटल इन्सुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पिक विमा योजनेतर्गत खरीप 2024 मध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत शेती क्षेत्राचे नुकसान झाल्यास विमा कंपनीकडे नुकसान भरपाई दावा दाखल करता येतो. विमा दावा मंजूर होण्यासाठी झालेल्या पीक नुकसानीची माहिती, पुर्वसुचना कंपनीस देणे गरजेचे आहे.
नुकसानीबाबतची सुचना पिक विमा कंपनीकडे नोंद करण्यासाठी पिक विमा ॲप अथवा कृषि रक्षक पोर्टल टोल फ्री क्रमांक 14447 या क्रमांकाचा वापर करावा. तसेच या क्रमांकाबाबत काही तांत्रिक अडचण आल्यास सदर आपत्तीची माहिती विमा कंपनीचे तालुका स्तरावरील प्रतिनिधी, बँक कृषि व महसुल विभाग यांना द्यावी असे आवाहनही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.