मतदान केंद्राध्यक्ष व सहाय्यक केंद्राध्यक्षांना दिले मतदान यंत्र हाताळणे व मतदान प्रक्रियेचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण
B1न्यूज मराठी नेटवर्क
धाराशिव : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 40 उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येत असलेल्या 242 उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातील 410 मतदान केंद्रावर 7 मे 2024 रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणूक मतदानासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण 6 व 7 एप्रिल रोजी धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृह नगरपरिषद आणि जिल्हा परिषद कन्या प्रशाला येथे संपन्न झाले.
6 एप्रिल रोजी 695 मतदान केंद्राध्यक्ष व सहाय्यक मतदान केंद्राध्यक्ष यांना दोन सत्रात प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाला जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे, अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिरीष यादव,उपजिल्हाधिकारी उदयसिंह भोसले,धाराशिव सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजय पाटील,धाराशिव तहसीलदार डॉ. मृणाल जाधव व कळंब तहसीलदार विजय अवधाने यांनी प्रथम सत्रामध्ये प्रशिक्षण व दुपारच्या सत्रामध्ये मतदान यंत्र हाताळणी व मतदान प्रक्रिया याबाबत प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन केले.
7 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृह तसेच जिल्हा परिषद कन्या प्रशाला येथे आयोजित प्रशिक्षण ठिकाणी मतदान यंत्र हाताळणी व मतदान प्रक्रिया यासंबंधीचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक देण्यात आले. 1130 इतर मतदान अधिकारी व महिला मतदानाधिकारी यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले व प्रशिक्षणार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी प्रशिक्षणास उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांकडून टपाली मतदानासाठी नमुना 12 व निवडणूक कार्य प्रमाणपत्रासाठी नमुना 12 अ मध्ये अर्ज भरून घेऊन कर्मचाऱ्यांच्या स्वतःच्या मतदानापासून कोणताही कर्मचारी वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात आली.या प्रशिक्षण व मतदान यंत्र हाताळणी व मतदान प्रक्रिया प्रशिक्षण कार्यशाळेला प्रात्यक्षिकासाठी सर्व प्रशिक्षणार्थी अधिकारी- कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.