निवडणूक खर्चाची माहिती कालमर्यादेत सादर करण्याचे आवाहन , रामटेक व नागपूर लोकसभा मतदारसंघ निवडणूक खर्चविषयक प्रशिक्षण संपन्न
B1न्यूज मराठी नेटवर्क
नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांनी आपल्या खर्चाची माहिती भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या कालमर्यादेत व विहित पद्धतीनुसार खर्च सनियंत्रण कक्षाकडे सादर करणे आवश्यक आहे. भारत निवडणूक आयोगाने खर्चासंदर्भात नेमून दिलेल्या मर्यादांचे पालन करावे, असे आवाहन निवडणूक विभागाद्वारे करण्यात आले.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदार संघातून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक रिंगणात असणा-या उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले आहे. वाटपानंतर निवडणूक खर्चासंदर्भात आयोगाच्या सर्व कायदेशीर तरतूदी आणि सूचना, त्यांचे पालन न केल्यास होणारे परिणाम समजावून सांगण्यासाठी बैठक व प्रशिक्षण नुकतेच संपन्न झाले. या बैठकीत उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना निवडणूक खर्चाचे प्रकार, लोकप्रतिनिधी कायदा, उमेदवारांना निवडणूक खर्चाची मर्यादा, उमेदवारांनी खर्च करण्याच्या पद्धती, उमेदवाराकडून ठेवण्यात येणारी निवडणूक खर्चाची नोंदवही, निवडणूक खर्चाच्या लेख्याची तपासणी, जिल्हा खर्च देखरेख समिती आदी विषयांची माहिती देण्यात आली.
प्रशिक्षणाला नागपूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक खर्च निरीक्षक गुरू भाष्यम, रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या प्रशिक्षणाला निवडणूक खर्च निरीक्षक मनिष द्विवेदी आणि अनुनय भाटी, रामटेक लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तुषार ठोंबरे, नागपूर कक्षाच्या खर्च सनियंत्रण कक्षाचे नोडल अधिकारी विलीन खडसे, रामटेक खर्च सनियंत्रण कक्षाच्या नोडल अधिकारी सीमा नन्होरे यांच्यासह उमेदवार, त्यांचे निवडणूक प्रतिनिधी, खर्च प्रतिनिधी या प्रशिक्षणास उपस्थित होते.
खर्च सनियंत्रण कक्षाचे नोडल अधिकारी विलीन खडसे यांनी नागपूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांना तर रामटेकच्या उमेदवारांना लेखाधिकारी शैलेश कोठे यांनी प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणादरम्यान उमेदवारांनी आपल्या निवडणूक खर्चविषयक विविध प्रश्नांची उत्तरे जाणून घेतली.