डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या बार्शी कार्यकारिणीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीप्रमाणे साजरी!
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना बार्शी तालुका कार्यकारिणीच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची 394 वी जयंती तिथीप्रमाणे साजरी करण्यात आली. तसेच बार्शी येथील खमक्या इंडिया च्या प्रधान कार्यालयामध्ये बार्शी तालुका कार्यकारणीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्य संघटक मुरलीधर चव्हाण हे होते तर राज्य कार्यकारणी सदस्य संतोष सूर्यवंशी, कोर कमिटीचे मार्गदर्शक तथा खमक्या इंडियाचे कार्यकारी संपादक अमित इंगोले, संघटनेचे कार्यालयीन सचिव शशांक शिंगाडे, पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अजय पाटील, सोलापूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष विजय कोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी 2024 – 25 सालाकरिता नवीन कार्यकारणीची निवड, शासन स्तरावर डिजिटल मीडियातील पत्रकारांना अधिकृत राजमान्यता, संघटनेच्या सदस्यांकरिता आरोग्य विमा, पत्रकारांसाठी विविध योजना व सवलती, पत्रकारांसाठी विविध कार्यशाळेचे आयोजन करणे, संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम घेणे, संघटनेचा वर्धापन दिन साजरा करणे, नवीन सदस्य नोंदणीसाठी नियमावली व संहिता ठरवणे आदी प्रकारच्या विषयावर सकारात्मक चर्चा होऊन बैठकीतील विषयास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या मार्गदर्शनाखाली चांदा ते बांदा पर्यंत पत्रकारांच्या न्याय व हक्कासाठी संघटना कार्यरत आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती असून त्यांच्या विचारधारेवर काम करत, कार्यकारणी सदस्यांनी आपले उद्देश, नियमावली, विविध कार्यशाळा, सामाजिक उपक्रम व कार्यप्रणाली याच्या संहितेचे पालन करणे गरजेचे असून, आपल्या सर्वांच्या प्रत्येक अडचणी वेळी संघटना आपल्या पाठीशी राहणार असल्याचे अमित इंगोले यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले आहे.
आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये बोलताना मुरलीधर चव्हाण म्हणाले की, पत्रकारितेमध्ये काम करत असताना आपणास आलेल्या अडचणी सोडवण्यासाठी, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांची प्रतिकृती असलेले संतोष सूर्यवंशी नेहमीच आपल्या सोबत आहेत. संघटनेच्या संहितेचे पालन करून संघटनेची कार्यप्रणाली व कार्यक्षेत्र वाढवण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करावेत तसेच, आगामी वर्षाची नविन कार्यकारिणीची घोषणा राजा माने यांच्या उपस्थितीत होईल असेही त्यांनी यावेळी म्हटले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन धीरज शेळके यांनी केले तर उपस्थितांचे आभार बार्शी तालुका अध्यक्ष दिनेश मेटकरी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी भैरवनाथ चौधरी, सिद्धार्थ बसवंत, अभिजीत शिंदे, गणेश शिंदे, किरण माने, अक्षय बारंगुळे, वैशाली ढगे आदींनी परिश्रम घेतले.