कामगारांची पारदर्शकतेने नोंदणी करून,शासकीय योजनांचा गतीने लाभ द्यावा : कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : जिल्ह्यामध्ये बांधकाम कामगारांची नोंदणी प्राधान्याने, पारदर्शकतेने व गतीने करा. सर्व घटकांतील कामगारांची नोंदणी करा व कामगारांसाठी असणाऱ्या सर्व योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत त्वरेने पोहोचवा, असे निर्देश कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे दिले.
कामगार विभागाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड, सरकारी कामगार अधिकारी विलास गायकवाड, नोंदणी अधिकारी ए. जी. पठाण, माजी महापौर श्रीकांचना यन्नम आदि उपस्थित होते.

कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, शासनाने प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन बांधण्याची मोहीम हाती घेतली आहे. सोलापूर जिल्ह्याचे कामगार भवन बांधण्यासाठी जागा पाहणी करावी. ईएसआय ह़ॉस्पिटलच्या धर्तीवर कामगारांसाठी दवाखाना उभारण्यासाठी एमआयडीसीमध्ये जागा उपलब्धतेसाठी जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घ्यावा. तसेच, नाक्यावरच्या बांधकाम कामगारांसाठी निवारा शेड उभारावेत, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.


कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत बांधकाम कामगारांसाठी असणाऱ्या सर्व योजनांचा लाभ तळागाळातील बांधकाम कामगारांपर्यंत पोहोचवावा. राज्य शासनाच्या शासन आपल्या दारी अभियानांतर्गत बांधकाम व अन्य सर्व कामगारांच्या नोंदणीला व योजनांच्या लाभवाटपाला प्राधान्य द्यावे, असे सूचित करून, मंत्री डॉ. खाडे यांनी विडी कामगार, यंत्रमाग कामगारांची नोंदणी होण्याच्या दृष्टीने केंद्र शासन स्तरावरून प्रयत्न केले जातील. कामगार घरकुल योजनेसाठी प्रस्ताव सादर करावेत, त्याला मंजुरी देण्यात येईल, असे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी कामगार विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला व त्यांच्या अडचणींचे निराकरण करण्याच्या दृष्टीने सूचना दिल्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या