B1न्यूज मराठी नेटवर्क

परभणी : आता शेतीमध्ये पारंपरिक पिकांना फाटा देत नवनवीन प्रयोग करणाचे दिवस आले असून, शेतकऱ्यांना प्रयोगशिल शेतकऱ्यांचे वेळावेळी मार्गदरर्शन घेणे काळाची गरज बनले आहे. ‘एकमेका साह्य करून अवघे धरू सुपंथ’ याप्रमाणे शेतकऱ्यांनी धुऱ्या-बांधावरुन भांडण-तंटे न करता, शिवारफेरी मारायला हवी. जगात कृषिक्षेत्रात होणारे बदल लक्षात घेत आपल्या पिक पद्धतीत बदल केले पाहीजेत. तरच शेतकरी बदलत्या जगाला सामोरे जावू शकेल, असा विश्वास त्यांच्या निर्माण करणे आवश्यक झाले असून, शेतकऱ्यांनी प्रयोगशिल शेतकऱ्यांना, त्यांच्या प्रयोगांना आणि कृषिप्रदर्शनांना भेटी दिल्या पाहीजेत. फळबागेतून आर्थिक उन्नती साधलेल्या अशाच एका प्रयोगशिल शेतकऱ्याची ही यशोगाथा…!

मागील अनेक वर्षांपासून राज्यातील शेतकरी बांधवांनी उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने फळबाग लागवड मोठ्या प्रमाणात सुरु केली आहे. राज्यात प्रामुख्याने मोसंबी, डाळिंब, केळी, पेरु यासारख्या फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. विशेष म्हणजे यातून शेतकऱ्यांना चांगली कमाई होते. सेलू तालुक्यातील डिग्रस बरसाले येथील प्रयोगशील शेतकरी बाळासाहेब दगडोबा बरसाले यांनी फळबागेतून आपली आर्थिक उन्नती साधली आहे. बरसाले यांना पेरुची शेती मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरल आहे. त्यात त्यांनी आपली बारमाही सिंचन सुविधा असलेली शेती फळबागेखाली आणून आपली आर्थिक उन्नतीदेखील साधली आहे. कृषि विभागाच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी फळबाग, भाजीपाला लागवडीचा पर्याय निवडलेला आहे. त्यामुळे येथील अनेक शेतकऱ्यांनी आर्थिक प्रगती साधली आहे.

बाळासाहेब बरसाले यांच्या कुटूंबाकडे एकूण १४ एकर बागायती शेती आहे. बरसाले यांनी इतर धान्य शेतीला फाटा देवून त्यांनी फळबाग लागवडीचा निर्णय घेतला. त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन आपल्या शेतात पेरु, मोसंबी फळबाग लागवड केली आहे. पेरु लागवडीसाठी बरसाले यांनी दोन एकरमध्ये सघन पध्दतीने व्हिएनआर जातीच्या ५०० पेरुची झाडे आणि तीन एकरमध्ये ४०० मोसंबी झाडांची लागवड केली. तसेच १०० लिंबूची देखील झाडे लागवड करुन त्यांची योग्य पद्धतीने निगा राखली. यामुळे श्री. बरसाले यांना पेरु आणि मोसंबीची शेती मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरली. पेरूच्या एका फळाचे ४०० ते ५०० ग्रॅम वजन भरले. दोन एकर पेरुच्या शेतीमधून त्यांना ३० टन झाल्याने १४ लाख रुपयांचे विक्रमी उत्पादन मिळाले. जास्तीचा दर मिळावा यासाठी त्यांनी फळांची वर्गवारी, प्रतवारी व पॅकिंग करुन विक्री केल्याने त्यांना इतरांपेक्षा जास्त दर मिळाला. त्यांनी या पेरुची काश्मीर आणि गुजरात राज्यात आणि जिल्ह्याबाहेरील बाजारपेठेत या फळांची विक्री केली.

बरसाले यांना मोसंबीतून १५ टन उत्पादन मिळाले आहे. या मोसंबीतून त्यांना सुमारे ४ लाखांचा नफा झाला आहे. तसेच सोयाबीन आणि भाजीपाला आदी पिकांची अंतरपिक म्हणून लागवड केली आहे. फळबागेतून शाश्वत उत्पादन मिळते. व यापुढेही उत्पन्नात भर पडत जाणार आहे. पारंपारिक शेतीला फाटा देवून त्यांनी इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श निर्माण केला आहे.
मागील १५ वर्षापासून मी शेती व्यवसाय करत असून, पारंपारिक शेतीला फाटा देवून मागील ९ ते १० वर्षापासून फळबागेची लागवड केली आहे. कमी कालावधीमध्ये अधिक उत्पन्न मिळू लागले आहे. फळबागेत आंतरपिक घेवून देखील नफा मिळवता येतो. शेतकरी बांधवांनी नव-नवीन प्रयोग करत आधुनिक शेती करावी. – बाळासाहेब बरसाले

अरुण सूर्यवंशी,
जिल्हा माहिती अधिकारी, परभणी


About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या