श्रीराम नवमी निमित्त बार्शी निघणार भव्य शोभायात्रा : ९ फूट उंचीची श्रीरामाची उत्सवमूर्ती ठरणार मुख्य आकर्षण

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : श्रीराम नवमी निमित्त बार्शी शहरात गुरूवारी, दिनांक 30 मार्च रोजी, दुपारी 4:00 वाजता, श्रीराम मंदिर भगवंत मंदिर मार्ग येथून श्रीरामाच्या नऊ फूट उंचीच्या उत्सवमूर्तीसह भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्रीराम नवमी मध्यवर्ती उत्सव समितीचे समन्वयक बापू कदम यांनी दिली. श्रीराम नवमी निमित्त गतवर्षी पासून मध्यवर्ती उत्सव समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शहरातील प्रमुख मार्गाने शोभा यात्रा काढण्यात येत आहे. यावर्षी देखील शोभा यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यावर्षी बार्शीचे सुपुत्र व प्रख्यात शिल्पकार पांडुरंग फपाळ यांनी श्रीरामाची नऊ फूट उंचीची आकर्षक उत्सवमूर्ती तयार केली असून ही मूर्ती शोभा यात्रेचे मुख्य आकर्षण आहे.

शोभा यात्रेच्या अग्रभागी गोमाता असून त्यामागे भगव्या ध्वजासह अश्व राहणार आहे. शोभा यात्रा शिस्तीत शहरातील प्रमुख मार्गाने काढण्यात येणार असून पारंपारिक वाद्यवृंदासह सहभागी राम भक्तांनी पारंपारिक पोषाख परिधान करून येण्याचे आवाहन उत्सव समितीच्या वतीने केले आहे. शोभा यात्रेची सुरवात श्रीराम मंदिरापासून होणार असून महाव्दार चौक, वीर सावरकर चौक, पटेल चौक, पानखुंट, ऐनापूर मारूती मंदिर रोड, आरएसएम हाईटस तेलगिरणी चौक मार्गे शिवाजी आखाडा, बसस्थानक चौक, पोस्ट चौक, जुने पोलीस स्टेशन, सोमवार पेठ ते नगरपरिषद मार्गे पुढे तानाजी चौक संकेश्वर उद्यान एकविराई मंदिर चौकातून पुढे राम मंदिर परिसरात शोभायात्रेचा समारोप करण्यात येणार आहे.

यावेळी हर घर गोमाता या अभियानांतर्गत गोवंश संगोपनाचा संकल्प केलेल्या नऊ गोपालकांचा मध्यवर्ती उत्सव समितीच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे. शोभा यात्रा यशस्वीतेसाठी मध्यवर्ती उत्सव समितीचे पदाधिकारी, सदस्यांसह राम भक्त परिश्रम घेत आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या