रेशीम शेतीत शाश्वत उत्पन्न देण्याची क्षमता – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड
B1न्यूज मराठी नेटवर्क
रेशीम पीक शेतकऱ्यांसाठी संजीवणी – कृषीरत्न विजय आण्णा बोराडे
तुती बाग जोपासना, रेशीम किटक संगोपन व कोष विक्री व्यवस्थापन शेतकरी प्रशिक्षण संपन्न
जालना : आत्मा अंतर्गत जिल्हा रेशीम कार्यालय व कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘तुती बाग जोपासना, रेशीम किटक संगोपन व कोष विक्री व्यवस्थापन शेतकरी प्रशिक्षण’ या विषयीचे एकदिवशीय प्रशिक्षण कार्यक्रम, कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी येथे गुरुवारी घेण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी शेतकऱ्यांना पटकन लखपती व्हायचे असेल तर त्यांनी रेशीम उद्योग करावा असे प्रतिपादन केले. याच बरोबर त्यांनी तुतीची लागवड काडया ऐवजी तुती रोपांनी केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पादनात पहिल्याच वर्षी रू.50,000/- ची वाढ होते. शेतकऱ्यांना आत्महत्यापासून रोखणारा रेशीम उद्योग आहे. शेतकऱ्यांना सातत्याने शाश्वत उत्पन्न देण्याची क्षमता रेशीम शेती व उद्योगामध्ये आहे. जालना येथे रेशीम अंडीपुंज निर्मिती ते रेशीम धागा निर्मितीपर्यंतच्या सर्व प्रक्रीया उद्योग कार्यान्वीत असुन जालन्याची रेशीम कोष बाजारपेठ शेतकऱ्यांना वरदान ठरत आहे. त्यामुळे जालना जिल्हयातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रेशीम शेतीचा स्वकिार करून आपले जीवन समृध्द करावे. मी स्वत: माझ्या शेतामध्ये तुती लागवड करून रेशीम कोषांचे उत्पादन घेण्यास सुरूवात केली आहे.” असे प्रतिपादन जिल्हाधिकारी यांनी केले.
कार्यक्रमास 250 रेशीम उत्पादक शेतकऱ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष,कृषीरत्न, विजय आण्णा बोराडे यांनी रेशीम पीक शेतकऱ्यांसाठी संजिवणी ठरत आहे, ’रेशीम उद्योगास अवकाळी पाऊस, जास्तीचा पाऊस, दुष्काळ या वातावरणातील बदलांचा विशेष विपरित परिणाम होत नाही. आहे. रेशीम उद्योगातील उत्पादन शश्वत आहे. कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी येथे महिलांना प्रशिक्षण विनामुल्य देण्यात येते. रेशीम उद्योग यशस्वी करण्यासाठी महिलांनी प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.जालना जिल्हयात रेशीम धागा तयार होत असुन आता त्यापुढे जाऊन महिलांना प्रशिक्षित करून घरोघरी हातमागावर पैठणी साडी विणकाम होणे आवश्यक आहे.
रेशीम विभागाचे सेवानिवृत उपसंचालक, दिलीप हाके यांनी रेशीम शेती ही गट शेतीप्रमाणे केल्यास अधिक फायदेशीर ठरते तसेच प्रत्येक शेतकऱ्यांनी 1.00 एकर ऐवजी 2.00 एकर क्षेत्रामध्ये तुती लागवड केल्यास शेतकऱ्यांना प्रत्येक महिन्यास वेतनाप्रमाणे रेशीम शेतीमधुन उत्पन्न मिळते, असे सांगीतले. तसेच रेशीम शेतकऱ्यांनी नवीन शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचे बाबतीत दत्तक घेउन काम केल्यास प्रत्येक शेतकरी रेशीम उद्योगामध्ये 100 टक्के यशस्वी झाल्याशिवाय रहाणार नाही, असे प्रतिपादन केले.
केंद्रीय रेशीम मंडळाचे शास्त्रज्ञ डॉ. रामप्रकाश वर्मा यांनी उपस्थीत शेतकऱ्यांना निर्जंतुकीकरन व सुधासित तंत्रज्ञान विषयी मार्गदर्शन केले. रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते यांनी तुती बाग व्यवस्थापन, किटक संगोपन तंत्रज्ञान या विषयी उपस्थीत शेतकऱ्यांना सादरीकरनव्दारे मार्गदर्शन केले. कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी येथील विषय विशेषज्ञ प्रा.अजय मिटकरी यांनी उझी माशीचे नियंत्रण या विषयी उपस्थीतांना मार्गदर्शन केले.
प्रस्तावना कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी चे वरीष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ.एस.व्हि.सोनुने यांनी केली. यादरम्यान त्यांनी, जालना जिल्हयात रेशीम उद्योग वाढीसाठी कृषी विज्ञान केंद्र, खरपुडीचे 20 वर्षापासुन योगदान असुन यामध्ये रेशीम उद्योगाचा प्रचार व प्रसिध्दी, रेशीम तंत्राज्ञान प्रशिक्षण व मार्गदर्शन ई.बाबी राबविल्या जात आहेत. कृषी विज्ञान केंद्र, खरपुडीव्दारे प्रशिक्षित अनेक युवकांनी रेशीम उदयोग सुरू करून आपले जिवनमान उंचावले आहे.
जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांचे हस्ते नव्याने रेशीम उदयोग करून 100 अंडीपुंजास 100 किलो पेक्षा जास्तउत्पादन घेणारे मच्छींद्रनाथ चिंचोली येथील युवा शेतकरी श्री.राज मुळे यांचे तसेच नांजा ता.भोकरदन येथील रेशीम उत्पादक जोडपे शरद मोरे व पुष्पा शरद मोरे यांचा पुष्प गुच्छ देवुन सत्कार करण्यात आला. तसेच कार्याक्रमामध्ये मान्यवरांच्या उपस्थीतीत व जिल्हाधिकारी यांचे हस्ते” रेशीम कोष बाजारपेठ व्यवस्थापन प्रणाली” या सॉफ्टवेअर व मोबाईल ॲपचे अनावरण करण्यात आले. सुत्रसंचालन, प्रा.अजय मिटकरी, कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी यांनी केले तर आभार प्रदर्शन रेशीम विकास अधिकारी बी.डी.डेंगळे यांनी केले.