बालविवाह झाल्याचे निदर्शनास आल्यास तातडीने खटला दाखल करावा – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड
B1न्यूज मराठी नेटवर्क
जालना : बालविवाह प्रथेचे समूळ उच्चाटन होण्यासाठी पालकासह मुलींमध्ये बालविवाहाच्या दुष्परिणामाची मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे आवश्यक आहे. बालविवाहाची माहिती होण्यासाठी प्रत्येक गावात बालमित्रांची नेमणूक करावी. जालना जिल्हा बालविवाह निर्मूलनाच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात बालविवाह झाल्याचे निदर्शनास आल्यास तातडीने खटला दाखल करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले. शुक्रवार दि.10 मार्च रोजी बालविवाह निर्मूलन कृती आराखडा समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, महिला व बालविकास अधिकारी रेश्मा चिमंद्रे यांच्यासह संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड म्हणाले की, बालविवाह निर्मूलन करण्यासाठी गावातील सर्व शालेय व शाळाबाह्य मुलींची माहिती संकलित करून वेळोवेळी आढावा घेणे गरजेचे आहे. शाळेत सतत गैरहजर असणाऱ्या मुलींची माहिती वेळोवेळी जाणून घ्यावी.
ग्रामस्तरावर काम करणाऱ्या अंगणवाडीसेविका किंवा ग्रामसेवकामार्फत प्रशासकीयस्तरावरून जे बालविवाह रोखण्यात आले होते, अशा मुलींचे विवाह 18 वर्षे वय पूर्ण झाल्यावर करण्यात आले का? याची माहिती जाणून घ्यावी. तसेच ग्राम संरक्षण समिती सक्रिय करण्यात यावी व ग्रामपंचायत स्तरावर प्रशिक्षण द्यावे. असे सांगून 1098 या टोल फ्री क्रमांकावर बालविवाह होत असल्यास माहिती द्यावी. संबंधित व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. अशा आशयाचे संदेश प्रत्येक गावात तीन ठिकाणी दर्शनीय भागावर सुस्पष्ट दिसून येतील, असे लावण्यात यावेत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. तसेच संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांकडून सविस्तर आढावा घेत योग्य त्या सूचना केल्या. यावेळी बालविवाह निर्मूलनासाठी शाळेत प्रत्येक सोमवारी एक चित्रफित दाखविण्यात येणार आहे. सदरची चित्रफीत यावेळी दाखविण्यात आली. बैठकीस जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, महिला व बालविकास विभाग, चाईल्ड लाईन, युनिसेफ समन्वयक सोनिया हंगे व बाळकृष्ण साळुंके यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.