प्रा. डॉ. राहुल पालके लिखित कर्मवीर प्रेरणा या पुस्तकाचे समाजदिनी प्रकाशन संपन्न
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांचे जीवन कर्मप्रेरणेचा गाभा आहे. त्यांनी दृढनिश्चयातून परिश्रम करून शिक्षणाचा मळा फुलविला. त्यातून संस्काराचे मोती घडले. त्यांची प्रेरणा लाखो विद्यार्थ्यांसाठी प्रेरक ठरली. हाच विचार केंद्रस्थानी ठेवून प्रा. डॉ.राहुल पालके यांनी कर्मवीर प्रेरणा या पुस्तकाचे लेखन केले.
समाजदिनी ४ फेब्रुवारी २०२६ रोजी कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या १२३ व्या जयंतीनिमित्त प्रा. डॉ.मिलिंद जोशी,अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, पुणे,श्रीमती डॉ. अरुणा ढेरे, ख्यातनाम साहित्यिक, अध्यक्ष, ९२ वे अ. भा. म. सा. संमेलन, यवतमाळ यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न झाले. याप्रसंगी श्री शिवाजी प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष नंदन जगदाळे, सचिव पी . टी. पाटील, सहसचिव ए.पी. देबडवार, खजिनदार जयकुमार ( बापूसाहेब) शितोळे, प्राचार्य ए. बी. शेख, प्रा. डॉ. समाधान पवार आदी उपस्थित होते.
या पुस्तकास जयकुमार शितोळे यांची प्रस्तावना लाभलेली आहे. डॉ. बी. वाय. यादव व प्रा.डॉ. सुब्राव जाधव यांचे अभिप्राय आहेत. डॉ. राहुल पालके यांनी या पुस्तकातून कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे समाजपरिवर्तन गौरव पुरस्काराने सन्मानित व्यक्तिमत्वांचा जीवनप्रवास रेखाटलेला आहे. यामध्ये क्रांतीअग्रणी जी. डी. बापू लाड,नागनाथ अण्णा नायकवडी, गेल ऑम्वेट , मा.आमदार गणपतराव देशमुख, डॉ. आ. ह. साळुंखे, डॉ. सुनीलकुमार लवटे,डॉ.भालचंद्र मुणगेकर, प्राचार्य अनिरुद्ध जाधव,डॉ. नरेंद्र दाभोलकर, डॉ.रमणलाल दोशी, डॉ. राजेंद्र भारूड, रणजितसिंह डिसले, पन्नालालभाऊ सुराणा पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर , डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांचा समावेश आहे.शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य विकासाची पालवी फुटत असते.
डॉ. जोशी यांनी या पुस्तकातून कर्मवीर
परंपरेचा प्रदीर्घ व वैभवशाली धागा जोडल्याची भावना व्यक्त केली. डॉ. ढेरे याप्रसंगी म्हणाल्या, कर्मवीर प्रेरणा हा महत्त्वाचा दस्तऐवज आहे. त्यातून कार्यप्रेरणेने भारावलेल्या पुरोगामी व्यक्तिमत्वांचा परिचय झालेला आहे. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी यांनी याप्रसंगी पुस्तक प्रकाशनास शुभेच्छा देवून कर्मवीर गाथेचा विचार माणुसकीचे बंध दृढ करील ही भावना मांडली.
डॉ. राहुल पालके म्हणाले, कर्मवीरांची ही चिरंतन प्रेरणा नवभारताचे स्वप्न साकारत असते. समाज, शिक्षण, आरोग्य, प्रशासन, संशोधन, संस्कृतीच्या पाऊलखुणा त्यातून अधिक गडद होतात.





