तहसीलदारांचे आंदोलन मागेसंप मिटला तरी सलग सुट्यांमुळे सोमवारपासून कामावर

B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : सोलापूरसह राज्यभरातील २२०० नायब तहसीलदार आणि ६०० तहसीलदार यांनी ३ एप्रिलपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले होते. राजपत्रित वर्ग दोन, नायब तहसीलदार या कार्यकारी पदाच्या विद्यमान ग्रेड-पे मुद्यांवरुन सुरू झालेला संप आश्वासनानंतर गुरुवारी (ता. ६) मागे घेण्यात आला.
सोलापुरात काम बंद आंदोलनाचा आज चौथा दिवस होता. त्यामुळे प्रशासकीय पातळीवरील बरीच कामे ठप्प झाली होती. सायंकाळी संप मागे घेण्यात आलेले जाहीर करण्यात आले मात्र, शुक्रवारपासून सलग तीन दिवस सुट्या असल्याने आता सोमवारीच काम सुरळीत होणार आहे. राज्य सरकारने १३ ऑक्टोबर १९९८ रोजी नायब तहसीलदार संवर्गाचा दर्जा वर्ग तीनवरुन वाढवून वर्ग दोन केला होता. मात्र वेतनवाढ केली नव्हती. मागील २५ वर्षांपासून राज्यातील नायब तहसीलदार वर्ग दोन या पदावर काम करतात, मात्र वर्ग तीनचे वेतन घेत आहेत. त्यामुळे नायब तहसीलदारांनाही इतर विभागांतील वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांएवढा ग्रेड पे वाढवून द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने केली आहे.
मुंबई येथे झालेल्या बैठकीत महासूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी नायब तहसिलदार राजपत्रित वर्ग २ यांचे ग्रेड पे ४८००/- रु. करण्याची मागणी अतिशय न्याय्य व आवश्यक असल्याचे सांगीतले आहे. या अनुषंगाने महसूल विभागाकडून सकारात्मक अभिप्रायासह प्रस्ताव उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांच्याकडे पाठविला असून या विभागाचा पालक या नात्याने स्वत: हा प्रस्ताव तात्काळ मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करीत असल्याचे सांगितले आहे. महसूलमंत्र्यांच्या आश्वासनावरून हा संप मागे घेण्यात येत असल्याचे तहसीलदार व नायब तहसीलदार संघटननेन कळविले आहे.