” बालकांचे संरक्षण ही समाजाची सामूहिक जबाबदारी” न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे यांचे प्रतिपादन

बरूर येथील गणेश चितळे प्रशालेत सुरक्षित बचपन अभियानांतर्गत जनजागृती
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर दि. 23 : बालकांना सुरक्षित स्पर्श आणि असुरक्षित स्पर्श यांतील फरक समजणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे धैर्य निर्माण होणे आणि स्वसंरक्षणाचे कौशल्य आत्मसात करणे, ही सुरक्षित बालपणाची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव अमोलकुमार देशपांडे यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर यांच्या वतीने बरूर येथील गणेश चितळे प्रशालेत सुरक्षित बचपन अभियानांतर्गत आयोजित जनजागृती कार्यक्रमात ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते.
यावेळी न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे यांनी सुरक्षित स्पर्श व असुरक्षित स्पर्श यांतील फरक स्पष्ट करून बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पॉकसो), बाल विवाह प्रतिबंध कायद्याची माहिती दिली. तसेच स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके सादर करून असुरक्षित प्रसंगी प्रतिकार कसा करावा, हे कृतीतून शिकवले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक सुनील हवीनाळे होते. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत न्यायाधीशांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधल्यामुळे बालवयातच योग्य जाणीव आणि जागरूकता निर्माण होण्यास मदत झाले, असे मत व्यक्त केले. व्यासपीठावर तुकाराम व्हनगुंडे, सिद्धाराम पुजारी आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरीशंकर बिराजदार यांनी केले, तर आभार नितीन बोरखडे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे कर्मचारी व गणेश चितळे प्रशालेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सुरेश कोळी, सचिन कोटगोंडे यांनी परिश्रम घेतले. अशी माहिती अधिक्षक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर यांनी दिली.




