ताणतणावमुक्त, आनंदी बार्शीसाठी ब्रह्माकुमारीजचा सेवाभावी पुढाकार! ५ हजार ईश्वरीय संदेशपत्रकांद्वारे जनजागृती; विनामूल्य राजयोग अभ्यासक्रमाला प्रतिसाद

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : ताणतणाव, नैराश्य आणि उदासीनतेपासून मुक्त होऊन नागरिकांच्या जीवनात मनःशांती, आनंद आणि नवचैतन्य निर्माण व्हावे, या उद्देशाने प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या बार्शी सेवाकेंद्राच्या वतीने आध्यात्मिक जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. आतापर्यंत सुमारे ५ हजार ईश्वरीय संदेशपत्रकांचे वितरण करण्यात आले असून, विनामूल्य साप्ताहिक राजयोग अभ्यासक्रमालाही नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. सेवाकेंद्र संचालिका राजयोगिनी संगीतादिदी यांच्या मार्गदर्शनाखाली हे सेवाकार्य सुरू आहे.
ब्रह्माकुमारी विद्यालयात दररोज श्रवण केल्या जाणाऱ्या ईश्वरीय महावाक्यांतून परमात्म्याचे अवतरण आणि सत्यधर्म स्थापनेचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याची प्रेरणा मिळते. याच प्रेरणेतून सेवाकेंद्राचे केअरटेकर कुमार साधक मोहनभाई बुचडे यांनी मांडलेल्या संकल्पनेला साथ देत ब्रह्माकुमारी परिवारातील ब्रह्मावत्स, साधक व सेवाधारी सहभागी या अभियानात सहभागी झाले . नवरात्रोत्सवात विविध देवी मंदिरांमध्ये संदेशपत्रक वितरणाने अभियानाचा प्रारंभ झाला. त्यानंतर दिवाळी पाडवा व कार्तिकी एकादशीला श्री भगवंत मंदिरात तसेच गणेश रोड, आडवारस्ता आणि खुरपे बोळ परिसरात घरोघरी पत्रकांचे वितरण करण्यात आले. या सेवेत होत आहेत.
‘भगवान पृथ्वीवर आले आहेत…! आपण त्यांना ओळखले आहे का?’ हा संदेश पत्रकांद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचविला जात आहे. भाविकांकडूनही पत्रकांना उत्सुकतेने प्रतिसाद मिळत आहे.
यासोबतच सेवाकेंद्रात, इच्छुकांच्या निवासस्थानी, मंदिरांमध्ये आणि सभागृहांत व्यक्तिगत अथवा सामूहिक स्वरूपात विनामूल्य साप्ताहिक राजयोग अभ्यासक्रम आयोजित केले जातात. यात आत्मपरिचय, परमात्म्याची ओळख आणि दैनंदिन जीवनातील राजयोगाचे महत्त्व चित्रांच्या माध्यमातून समजावून सांगून ध्यानधारणेचा अनुभव दिला जातो. इच्छुक स्त्री-पुरुषांना दररोज सकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत आपल्या सोयीनुसार एक तास देऊन या अभ्यासक्रमाचा लाभ घेता येतो.
‘स्वतः बदला – विश्व बदलेल’ या संदेशानुसार आध्यात्मिक ज्ञान व राजयोगाच्या अभ्यासातून सकारात्मक परिवर्तन घडविणे हा अभियानाचा मुख्य हेतू आहे. सर्व धर्मीयांसाठी खुली असलेली ही विनामूल्य सेवा घराघरांत सुख, शांती, समाधान आणि आनंद निर्माण करण्यासाठी समर्पित आहे.




