आयटीआय’चे प्रशिक्षणार्थी हे औद्योगिक विकासाचे आधारस्तंभ; कौशल्य विकास आणि संस्थांच्या आधुनिकीकरणावर शासनाने अधिक भर द्यावा – खासदार प्रणिती शिंदे

सोलापुरात महात्मा बसवेश्वर शासकीय आयटीआयचा पाचवा कौशल्य दीक्षांत समारंभ उत्साहात संपन्न; प्रशिक्षणार्थींना खासदार प्रणिती शिंदे यांचे मार्गदर्शन
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून घडणारे प्रशिक्षणार्थी हे औद्योगिक विकासाचे खरे आधारस्तंभ असून, हेच देशाची मोठी संपत्ती आहेत. बदलत्या काळात तरुणांनी पारंपरिक शिक्षणासोबतच प्रत्यक्ष प्रात्यक्षिक आणि तांत्रिक कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे. त्यामुळे आयटीआय संस्थांचा विकास आणि आधुनिकीकरण यावर शासनाने अधिक भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन खासदार प्रणितीताई शिंदे यांनी केले.
सोलापूर येथील विजापूर रोडवरील महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) यांच्या वतीने आयोजित पाचव्या कौशल्य दीक्षांत समारंभात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी यशस्वी प्रशिक्षणार्थींचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, आजचे युग हे तंत्रज्ञान आणि स्पर्धेचे युग आहे. उद्योगक्षेत्रात झपाट्याने बदल होत असून, या बदलांना सामोरे जाण्यासाठी तरुणांकडे प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि तांत्रिक कौशल्य असणे अत्यंत गरजेचे आहे. आयटीआयमधून मिळणारे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना केवळ रोजगार मिळवून देणारे नसून त्यांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनविण्याचा भक्कम पाया आहे.
पुढे त्या म्हणाल्या की, आयटी पार्कच्या बरोबरीने किंबहुना त्यापेक्षाही अधिक रोजगारनिर्मितीची क्षमता असलेल्या आयटीआय संस्थांच्या विकासाकडे लक्ष देण्याची गरज आहे. कौशल्याधारित शिक्षणाला प्रोत्साहन देऊन तरुणांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. स्वावलंबी गाव, स्वावलंबी तरुण आणि ग्रामीण भागात विकासाच्या संधी निर्माण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. विकास हा केवळ शहरांपुरता मर्यादित न राहता तो खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
संस्था व्यवस्थापन समितीचे सदस्य तथा ज्येष्ठ पत्रकार दशरथ वडतिले यांनी यशस्वी प्रशिक्षणार्थींचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. संस्थेचे प्राचार्य मनोज बिडकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविकात संस्थेच्या प्रगतीचा आढावा सादर केला.
या कार्यक्रमास सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेश डोंगरे, शिंदे शिवसेना गटाचे नेते अमोल शिंदे, काँग्रेसचे प्रसिद्धीप्रमुख तिरुपती परकीपंडला, संस्था व्यवस्थापन समितीचे सदस्य दशरथ वडतिले, संस्थेचे कर्मचारी, प्रशिक्षणार्थी विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय भांगे व शुभम फसले यांनी केले, तर गटनिदेशक सिद्राम गोलेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमानंतर खासदार प्रणितीताई शिंदे यांनी सर्व प्रशिक्षणार्थी विद्यार्थी व विद्यार्थिनींसोबत बसून छायाचित्रे काढली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण निर्माण झाले. तसेच आयटीआयच्या विकासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही देत, संस्थेच्या विविध प्रश्नांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.




