कृषीपुणेमहाराष्ट्रयोजना

पशुपालक आणि शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना; २६ नोव्हेंबरपासून महाडीबीटी २.० वर अर्ज प्रक्रिया सुरू

दुधाळ गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, कुक्कुटपालन आणि वराहपालनासाठी मिळणार अनुदानाचा लाभ; महा-आयडीद्वारे अर्ज करणे बंधनकारक

B1न्यूज मराठी नेटवर्क350

पुणे, दि. २२ नोव्हेंबर : ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासह शेतकरी, महिला आणि तरुणांना पशुपालनाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना’ मंजूर केली आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेच्या ऑनलाइन अर्ज स्वीकृती प्रक्रियेला २६ नोव्हेंबर २०२६ पासून महाडीबीटी २.० प्रणालीवर टप्प्याटप्प्याने सुरुवात होणार आहे. निधीच्या उपलब्धतेनुसार जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय योजनांमधील विविध प्रवर्गांचे अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना दुधाळ गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, कुक्कुटपक्षी आणि वराहपालनासाठी तसेच वैरण उत्पादन व पशुसंवर्धन व्यवसायासाठी आवश्यक निवडक संसाधनांचा अनुदान तत्त्वावर पुरवठा करण्यात येणार आहे. दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन आणि शेळी-मेंढीपालनाला आर्थिक पाठबळ मिळाल्यामुळे ग्रामीण भागात स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्यास मदत होणार आहे. शेतकरी आणि पशुपालकांना केवळ पशुधनाचे उत्पादक न ठेवता सक्षम उद्योजक बनविण्याच्या दृष्टीने ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे.350

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य

या योजनेचा लाभ उपलब्ध निधीच्या मर्यादेत ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर पात्र लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक पशुपालक आणि शेतकऱ्यांनी अर्ज करण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रे व नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून ठेवणे आवश्यक आहे.

असा करा ऑनलाइन अर्ज

योजनेसाठी अर्जदारांना “महाडीबीटी २.०” (https://mahadbt2.maharashtra.gov.in/) या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. संकेतस्थळावर ‘पशुसंवर्धन विभागाच्या योजना’ हा पर्याय निवडून अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येईल. अर्जदार स्वतःच्या मोबाईल किंवा संगणकावरून तसेच महा-ई-सेवा केंद्र (महा-सेतू) अथवा आपले सरकार केंद्रामार्फत अर्ज करू शकतात.

अर्ज करण्यासाठी महा-आयडीद्वारे लॉगिन करणे बंधनकारक आहे. त्यासाठी महाडीबीटी २.० संकेतस्थळावर आधार प्रमाणीकरण करून महा-आयडी तयार करावा लागेल. महा-आयडी क्रमांक प्राप्त होण्यासाठी साधारणतः २४ तासांचा कालावधी लागतो.

जमीनधारक शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी आवश्यक

ज्या अर्जदारांच्या नावे जमीन आहे, मात्र त्यांच्याकडे फार्मर आयडी उपलब्ध नाही, त्यांनी ॲग्रीस्टॅकच्या “फार्मर रजिस्ट्री पोर्टलवर” (https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/) नोंदणी करून फार्मर आयडी तयार करणे आवश्यक आहे. फार्मर आयडी नसल्यास ज्या योजनांसाठी जमीन असणे आवश्यक आहे, त्या योजनांसाठी अर्ज करता येणार नाही.350फार्मर आयडी तयार असलेल्या अर्जदारांची जमीन व संबंधित माहिती प्रणालीमध्ये उपलब्ध होईल. भूमिहीन तसेच वनहक्कधारक अर्जदारांना त्यांच्या पात्रतेनुसार संबंधित योजनांचे पर्याय उपलब्ध होतील.

अर्ज करताना या बाबींची घ्या काळजी

अर्जदारांची वैयक्तिक माहिती, नाव, पत्ता, जमीन, जात प्रवर्ग आणि शिधापत्रिका क्रमांक आदी माहिती महा-सारथी यूसीडीएच, ॲग्रीस्टॅक आणि डिजिलॉकरमधून स्वयंचलितपणे प्राप्त होणार आहे. ही माहिती प्राप्त न झाल्यास तारांकित (*) स्वरूपात दर्शविलेली माहिती अर्जदाराने स्वतः भरायची आहे.

योजनेच्या निकषांनुसार अर्जदार पात्र असलेल्या योजनाच त्यांना प्रणालीमध्ये दिसतील. ज्या योजनांमध्ये शेतकरी गट, एफपीओ किंवा संस्था पात्र आहेत, तेथे संस्थेच्या प्रतिनिधींनी स्वतःच्या महा-आयडीद्वारे अर्ज करणे आवश्यक आहे.

अर्ज करताना आवश्यक घटकांची निवड काळजीपूर्वक करावी. अर्ज सादर केल्यानंतर योजना किंवा निवडलेल्या घटकात बदल करता येणार नाही. चुकीची माहिती भरल्याचे लक्षात आल्यानंतर दुरुस्ती करायची असल्यास यापूर्वी सादर केलेले अर्ज रद्द होतील, याची अर्जदारांनी नोंद घ्यावी.

एका कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ देय राहणार आहे. त्यामुळे अर्जदारांनी शिधापत्रिका तयार ठेवणे आवश्यक आहे.

अनुदान थेट आधार संलग्न बँक खात्यात

योजनेअंतर्गत मिळणारा लाभ थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) पद्धतीने लाभार्थ्याच्या आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक असल्याची खात्री करून घ्यावी.

तसेच, लाभार्थ्यांनी आपल्याकडील पशुधनाची भारत पशुधन प्रणालीवरील नोंदणी अद्ययावत ठेवण्यासाठी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.

फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई

योजनेच्या प्रभावी आणि पारदर्शक अंमलबजावणीसाठी पशुसंवर्धन विभागाने काटेकोर नियोजन केले आहे. या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कोणत्याही खासगी संस्था किंवा व्यक्तीला प्राधिकृत करण्यात आलेले नाही. त्यामुळे योजनेच्या नावाखाली दिशाभूल करणारी माहिती पसरवून लाभार्थ्यांची फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पशुसंवर्धन विभागाने दिला आहे.350

अधिक माहितीसाठी संपर्क

योजनेबाबत शंका किंवा अडचणी असल्यास लाभार्थ्यांनी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात अथवा पशुसंवर्धन विभागाच्या तालुका व जिल्हास्तरीय कार्यालयांशी संपर्क साधावा.

पशुसंवर्धन विभाग टोल फ्री क्रमांक : १९६२

व्हॉट्सॲप चॅटबॉट : ९०६३१४२२९९

महाडीबीटी पोर्टलवरील तांत्रिक अडचणींसाठी : ०२२-४९१५०८००

ऑनलाइन अर्ज : https://mahadbt2.maharashtra.gov.in/

महा-आयडी : https://mahasarathi.maharashtra.gov.in/

फार्मर आयडी : https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/

‘समृद्ध पशुधन – विकसित महाराष्ट्र’ या संकल्पनेला अनुसरून ग्रामीण भागातील अर्थकारण अधिक गतिमान करण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ग्रामीण भागातील युवक-युवती, महिला, शेतकरी आणि पशुपालकांनी योजनेची माहिती घेऊन पात्रतेनुसार लाभासाठी अर्ज करावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.350

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button