वक्तृत्वाच्या जोरावर हिंदवी शेळकेची भरारी : आंतरशालेय स्पर्धेत दोन सिल्व्हर मेडल वर कोरले नाव!

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : बार्शी येथील सुयश विद्यालयात इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत असलेली कु. हिंदवी धिरज शेळके हिने आपल्या प्रभावी वक्तृत्वशैलीच्या जोरावर आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावत दोन सिल्व्हर मेडल मिळवण्याचा मान पटकावला आहे. पत्रकार धिरज शेळके यांचे कन्या असलेल्या हिंदवीला लहानपणापासूनच वक्तृत्वाचे व निर्भिडतेचे बाळकडू लहानपणापासून घरातूनच मिळाले आहे. हिंदवीने वक्तृत्व स्पर्धेत दोन वेगवेगळ्या विषयांवर आपले विचार प्रभावीपणे मांडले.
‘मोबाईल वरदान की शाप’ या विषयावर बोलताना तिने आजच्या आधुनिक युगातील मोबाईलचे वाढते महत्त्व, ऑनलाइन शिक्षण, माहितीची उपलब्धता, दैनंदिन जीवनातील उपयोग तसेच मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम यांची वास्तववादी आणि अभ्यासपूर्ण मांडणी केली. मोबाईलचा योग्य वापर केल्यास तो वरदान ठरू शकतो, तर अतिरेकी वापरामुळे तो शापही ठरू शकतो, हा महत्त्वपूर्ण संदेश तिने आपल्या वक्तृत्वातून दिला. तिच्या या प्रभावी सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.
तसेच ‘सरदार वल्लभभाई पटेल यांचे जीवनचरित्र’ या विषयावर हिंदवीने भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनकार्याचा, संघर्षाचा, देशभक्तीचा आणि राष्ट्राच्या एकात्मतेसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा आढावा घेतला. त्यांच्या प्रेरणादायी जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंग आणि विचार प्रभावीपणे मांडत तिने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. दोन्ही विषयांवरील अभ्यासपूर्ण तयारी, आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण, स्पष्ट उच्चार, हावभाव आणि प्रभावी वक्तृत्व याच्या जोरावर हिंदवीने दोन सिल्व्हर मेडल मिळवण्याची कामगिरी केली.
हिंदवीच्या या यशाबद्दल सुयश विद्यालयाचे संस्थापक शिवदास नलावडे, मुख्याध्यापिका अलका जगताप, उपमुख्याध्यापक येवले यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक व सांस्कृतिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, वक्तृत्वाच्या माध्यमातून आपल्या विचारांची छाप उमटवणाऱ्या हिंदवीच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.




