सोलापूर जिल्ह्यातील ३४ साखर कारखान्यांना गाळप परवाने मंजूर, एफआरपी थकबाकीमुळे दोन कारखान्यांचे परवाने रोखले; परवानगी नसलेल्या कारखान्यांना ऊस पुरवठा न करण्याचे प्रशासनाचे आवाहन

B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर, दि. २३ : गाळप हंगाम २०२६-२७ करिता सोलापूर जिल्ह्यातील एकूण ४० साखर कारखान्यांपैकी ३५ कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज केले होते. त्यापैकी ३४ साखर कारखान्यांना गाळप परवाने मंजूर करण्यात आले आहेत. एफआरपीची रक्कम थकविल्यामुळे दोन कारखान्यांचे गाळप परवाने अद्याप रोखण्यात आले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी प्रादेशिक सहसंचालक (साखर), सोलापूर विभाग यांच्या कार्यालयामार्फत महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त, पुणे यांच्या ऑनलाइन गाळप परवाना प्रणालीवर अर्ज केले होते. त्यापैकी ३४ कारखान्यांना आजपर्यंत गाळप परवाने मंजूर करण्यात आले आहेत. धाराशिव जिल्ह्यातील एकूण १७ साखर कारखान्यांपैकी १४ कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज केले असून, त्यापैकी १२ कारखान्यांना परवाने मंजूर करण्यात आले आहेत.
गत गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम अदा न केल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील श्री संत कुर्मदास सहकारी साखर कारखाना लि., पडसाळी, ता. माढा आणि गोकुळ शुगर इंडस्ट्रीज लि., धोत्री, ता. दक्षिण सोलापूर या दोन कारखान्यांवर आर.आर.सी. अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे या दोन्ही कारखान्यांना गाळप हंगाम २०२६-२७ साठी अद्याप गाळप परवाने मंजूर करण्यात आलेले नाहीत.
धाराशिव जिल्ह्यातील क्वुनर्जी इंडस्ट्रीज लि., समुद्राळ, ता. उमरगा (भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना लि.) आणि आयान मल्टिट्रेड एलएलपी, इडाजवळा, ता. भूम (बाणगंगा सहकारी साखर कारखाना लि.) या दोन कारखान्यांनाही गाळप परवाने मंजूर करण्यात आलेले नाहीत.
परवाना नसलेल्या कारखान्यांना ऊस पुरवठा करू नका
गाळप परवाना प्राप्त नसलेल्या कारखान्यांना गाळप हंगाम २०२६-२७ मध्ये ऊस गाळपासाठी देऊ नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने सर्व ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. परवाना नसलेल्या कारखान्यांना ऊस पुरवठा केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांची राहील. त्यामुळे शेतकरी बांधवांनी याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असे प्रादेशिक सहसंचालक (साखर), सोलापूर विभाग यांनी कळविले आहे.




