कृषीमहाराष्ट्रयोजनारायगड

आंबा व काजू फळपीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेवटचे १० दिवस शिल्लक

B1न्यूज मराठी नेटवर्क350

रायगड-अलिबाग : पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेंतर्गत आंबा व काजू पिकांचा विमा उतरविण्यासाठी शेतकऱ्यांकडे आता शेवटचे १० दिवस शिल्लक आहेत. आंबा व काजू पिकांसाठी विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२६ असून, शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता लवकर विमा नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे यांनी केले आहे.

बदलत्या हवामानामुळे फळपिकांच्या उत्पादकतेवर परिणाम होऊन शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. अशा हवामान धोक्यांपासून फळपिकांना संरक्षण मिळावे आणि नुकसान झाल्यास भरपाई मिळावी, यासाठी कृषी विभागामार्फत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना राबविण्यात येत आहे. यावर्षी रायगड जिल्ह्यात आंबा व काजूसह नारळ आणि सुपारी या फळपिकांचाही योजनेत समावेश करण्यात आला आहे.

लोकप्रतिनिधी व कृषी विभागाच्या पाठपुराव्यामुळे यंदा आंबा पिकाचा विमा संरक्षण कालावधी १५ मे ऐवजी ३१ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. तसेच आंबा पिकासाठी शेतकऱ्यांचा विमा हप्ता प्रति हेक्टर १४ हजार ५०० रुपयांवरून कमी करून ८ हजार ५०० रुपये करण्यात आला आहे.350

विमा संरक्षण व शेतकरी हप्ता

आंबा: विमा संरक्षित रक्कम १ लाख ७० हजार रुपये प्रति हेक्टर; शेतकरी हप्ता ८ हजार ५०० रुपये.

काजू: विमा संरक्षित रक्कम १ लाख २० हजार रुपये प्रति हेक्टर; शेतकरी हप्ता ४ लाख ८०० रुपये.

जिल्ह्यात आंबा पिकासाठी ६९, काजूसाठी ३८, नारळासाठी ११ आणि सुपारीसाठी ११ महसूल मंडळे अधिसूचित करण्यात आली आहेत. आंबा व काजू पिकांच्या उत्पादनक्षम फळबागांना विमा संरक्षण देण्यात येणार असून, आंबा व काजूच्या फळबागांचे वय किमान ५ वर्षे असणे आवश्यक आहे.

कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी या योजनेतील सहभाग ऐच्छिक आहे. खातेदार शेतकऱ्यांबरोबरच कुळ व भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरीही योजनेत सहभागी होऊ शकतात. मात्र, भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी नोंदणीकृत भाडेकरार विमा पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक आहे. एका शेतकऱ्याला अधिसूचित फळपिकांसाठी किमान ०.१० हेक्टर ते कमाल ४ हेक्टर क्षेत्राचा विमा उतरविता येणार आहे.

योजनेत सहभागी होण्यासाठी Agristack अंतर्गत शेतकरी ओळखपत्र (Farmer ID) असणे तसेच ई-पीक पाहणी DCS मोबाईल ॲपमध्ये संबंधित फळपिकाची नोंद असणे आवश्यक आहे. विमा अर्जासोबत फळबागेचा जिओ टॅगिंग असलेला फोटो अपलोड करणेही अनिवार्य आहे.

विमा हप्ता आपले सरकार सेवा केंद्र (CSC), बँक किंवा www.pmfby.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन भरता येणार आहे. रायगड जिल्ह्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत ही योजना राबविण्यात येत आहे.350

विमाधारक शेतकऱ्यांना पर्जन्यमान, तापमान, वाऱ्याचा वेग, आर्द्रता आदी हवामान घटकांमुळे निर्धारित निकषांनुसार नुकसान झाल्यास विमा भरपाई मिळू शकते. हवामानाची नोंद महसूल मंडळनिहाय स्वयंचलित हवामान केंद्रांद्वारे करण्यात येते. गारपीट किंवा वेगवान वाऱ्यामुळे नुकसान झाल्यास संबंधित विमा कंपनी अथवा कृषी विभागाला ७२ तासांच्या आत तक्रार कळविणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांनी विमा नोंदणीसाठी अंतिम मुदतीच्या वेळी होणारी गर्दी टाळून वेळेत सहभाग नोंदवावा. अधिक माहितीसाठी गावातील सहाय्यक कृषी अधिकारी किंवा कृषी विभागाशी संपर्क साधावा. जिल्हा फळपीक विमा कंपनी प्रतिनिधी राहुल लाडगे यांच्याशी ८३०८००६६०० या क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे यांनी केले आहे.350

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button