मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आमदार राजेंद्र राऊत यांचा सत्कार
पंढरपूरमध्ये शेतकरी मेळावा व राज्यस्तरीय कृषी महोत्सव उत्साहात संपन्न
B1न्यूज मराठी नेटवर्क
पंढरपूर : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत भव्य कृतज्ञता शेतकरी मेळावा व सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. या सोहळ्यात विधानपरिषद आमदारपदी निवड झाल्याबद्दल आमदार राजेंद्र राऊत यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते विशेष सत्कार करण्यात आला. या सन्मानाबद्दल आयोजन समितीचे आभार मानताना, “आजच्या या सन्मानाने मन भारावून गेले असून, हा सन्मान माझ्यासाठी अधिक जबाबदारीने जनतेची सेवा करण्याची प्रेरणा आहे,” अशी भावना आमदार राजेंद्र राऊत यांनी व्यक्त केली.
याच कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक कृषी पंढरी–२०२६’ या राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, शेतकरी कल्याण आणि कृषी विकासाला चालना देणारा हा महोत्सव शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या कार्यक्रमास पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार प्रशांत परिचारक, आमदार समाधान आवताडे, आमदार विजय देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार उत्तम जानकर, सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार-सावंत, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली हळणवर, संदीप गिड्डे-पाटील तसेच स्थानिक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी आणि सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील हजारो शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.





