अंतर्मनातील सद्गुणांचा दीप प्रज्वलित करणे, हीच खरी दिवाळी!बार्शी सेवाकेंद्रावर दीपोत्सव उत्साहात साजरा

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या बार्शी सेवाकेंद्रावर रविवार, दिनांक ८ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत दीपोत्सव उत्साहपूर्ण व आध्यात्मिक वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ६.३० ते ७ या वेळेत सामूहिक योगसाधनेने झाली. त्यानंतर सकाळी ७ ते ८ या वेळेत ईश्वरीय महावाक्य मुरलीचे श्रवण करण्यात आले. आजच्या विशेष दीपावलीनिमित्त मुरलीमध्ये शिवबाबांनी दिवाळीचा खरा आध्यात्मिक अर्थ स्पष्ट केला. केवळ बाह्य दिवे प्रज्वलित करणे म्हणजे दिवाळी नव्हे, तर मनातील अज्ञान, नकारात्मक विचार व दुर्गुण दूर करून प्रेम, शांती, पवित्रता आणि सद्गुणांचा दीप प्रज्वलित करणे, हीच खरी दिवाळी होय. तसेच आत्मपरीक्षण करून जुन्या नकारात्मक सवयी सोडण्याचा व नवीन श्रेष्ठ संस्कार धारण करण्याचा दृढ संकल्प करण्याचा संदेश देण्यात आला.
यानंतर सेवाकेंद्र संचालिका संगीता दीदी, निशा दीदी, अनु दीदी करवा, तुळशीभाई गव्हाणे, मोहनभाई बुचडे, स्वप्नील पुकाळे तसेच सर्व कुमार-कुमारी विद्यार्थ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर सभागृहातील उपस्थित प्रत्येक साधकाच्या हातात प्रज्वलित मेणबत्ती देण्यात आली. सभागृहासह सेवाकेंद्राच्या इमारतीची आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच सभागृहात आकर्षक कृत्रिम फुलांची सजावट करण्यात आली होती. दीपावलीच्या विशेष गीतांवर सर्व उपस्थितांनी उत्साहाने दैवी नृत्य सादर केले.
अंतर्मनातील सद्गुणांचा दीप प्रज्वलित करून स्वतःचे जीवन प्रकाशमय बनवावे आणि आपल्या विचारांनी व कृतींनी इतरांच्या जीवनातही आनंदाचा प्रकाश पसरवावा, हा या दीपोत्सवाचा विशेष संदेश होता.





