जिल्हास्तर युवा महोत्सव १८ नोव्हेंबर रोजी १५ ते २९ वयोगटातील युवक-युवतींना सहभागी होण्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश मोहारे यांचे आवाहन

B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सोलापूर यांच्या वतीने जिल्हास्तर युवा महोत्सव २०२६-२७ चे आयोजन बुधवार, दि. १८ नोव्हेंबर २०२६ रोजी करण्यात आले आहे. हा महोत्सव सकाळी ९ वाजता सिद्धेश्वर मंदिराजवळील निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे होणार आहे. जिल्ह्यातील १५ ते २९ वयोगटातील युवक-युवतींनी या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश मोहारे यांनी केले आहे.
युवकांचा सर्वांगीण विकास साधणे, भारतीय संस्कृती व परंपरेचे जतन करणे तसेच युवकांमधील सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे.
महोत्सवामध्ये लोकनृत्य, लोकगीत, पथनाट्य, काव्यलेखन आणि चित्रकला या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. सर्व स्पर्धांसाठी ‘Nasha Mukt Yuva for Viksit Bharat’ ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे.
स्पर्धांमधील विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. लोकनृत्य स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे ७ हजार, ५ हजार व ३ हजार रुपये; लोकगीत आणि पथनाट्य स्पर्धेसाठी अनुक्रमे ५ हजार, ३ हजार व २ हजार ५०० रुपये; तर काव्यलेखन व चित्रकला स्पर्धेसाठी अनुक्रमे ३ हजार, २ हजार व १ हजार ५०० रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे.
या महोत्सवासाठी स्पर्धकांचे वय १५ ते २९ वर्षे असणे आवश्यक असून, जन्मदिनांक १८ ऑगस्ट १९९७ ते १७ ऑगस्ट २०११ या कालावधीतील असावा. सहाय्यक कर्मचाऱ्यांचे वय १८ ते ४० वर्षे असणे आवश्यक आहे. स्पर्धकांनी दहावी बोर्ड प्रमाणपत्र व आधार कार्डची छायांकित प्रत अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे.
तसेच MY Bharat Portal (https://mybharat.gov.in/yuva_register) वर नोंदणी करणे आवश्यक आहे. इच्छुक स्पर्धकांनी प्रवेश अर्ज शाळा, महाविद्यालय किंवा संस्थाप्रमुखांच्या स्वाक्षरी व शिक्क्यासह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सोलापूर येथे जमा करावा किंवा jilhayuwamahotsav@gmail.com या ई-मेलवर पाठवावा. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत आहे.
अधिक माहितीसाठी दत्तात्रय वरकड, मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी यांच्याशी ७२१९१५५२५२, ९५०३५२०२५८ किंवा ८०१०३५०४२४ या क्रमांकांवर संपर्क साधावा. जिल्ह्यातील सर्व उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालये, राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.), राष्ट्रीय छात्र सेना (एन.सी.सी.) विभाग तसेच युवक मंडळांनी आपल्या परिसरातील जास्तीत जास्त कलावंत व गुणवंत युवक-युवतींना या महोत्सवात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश मोहारे यांनी केले आहे.




