विकासकामे वेळेत आणि दर्जेदार पूर्ण करा; निधी परत जाता कामा नये – मंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश

0

कागल मतदारसंघातील प्रलंबित कामांचा आढावा

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

कोल्हापूर, दि. १३ : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झालेली सर्व कामे विहित वेळेत पूर्ण करा. रस्त्यांचा दर्जा उत्तम असावा आणि कोणत्याही परिस्थितीत विकासकामांचा निधी शासनाकडे परत जाणार नाही, याची दक्षता घ्या, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहू सभागृहात कागल मतदारसंघातील प्रलंबित कामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

ज्या गावांमध्ये गावठाण भागातील रस्त्यांच्या उंचीबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत, तिथे ग्रामस्थांशी चर्चा करून सामोपचाराने अंतिम निर्णय घेण्याचे आदेश त्यांनी दिले. मात्र, हे प्रश्न सोडवत असताना इतर मंजूर रस्त्यांची कामे थांबवू नयेत, ती त्वरित पूर्ण करावीत, असे त्यांनी जिल्हा परिषद कार्यकारी अभियंत्यांना बजावले. गडहिंग्लज तालुक्यातील हिरण्यकेशी नदीतील गाळ काढण्याची स्थानिकांची जुनी मागणी आहे. पावसाळ्यापूर्वी, म्हणजेच मे अखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. मांगलेवाडी, कदमवाडी, गवळीवाडा व पाटीलवाडा या भागांचा गडहिंग्लज गावठाणात समावेश करून रहिवाशांना प्रॉपर्टी कार्ड देण्याबाबत चर्चा झाली. यासाठी आवश्यक असलेल्या सर्वेक्षणाचा निधी नगरविकास विभागाकडून उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन मंत्री मुश्रीफ यांनी दिले.5000गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आंबे-ओहळ मध्यम प्रकल्पातील पुनर्वसनाच्या कामांबाबत मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. येत्या १५ दिवसांत मोजणी प्रक्रियेसाठी आवश्यक पैसे भरल्याची खात्री करून मोजणी पूर्ण करावी आणि त्यानंतर तातडीने निवाडा प्रक्रिया राबवावी, असे स्पष्ट आदेश त्यांनी दिले. कागल तालुक्यातील यळगूड ते निढोरी रस्त्याचे काम सुरू असताना कंत्राटदाराकडून सांगाव येथील जलवाहिनी तोडल्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. हा पुरवठा त्वरित पूर्ववत करण्याच्या सूचना त्यांनी यंत्रणेला दिल्या. तसेच, जिथे तांत्रिक अडचणी आहेत तिथे सिमेंटऐवजी डांबरी रस्ते करता येतील का, याचा विचार करून सर्वसामान्यांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने कामे पूर्ण करण्याचे निर्देश कंत्राटदारांना देण्यात आले.

कागल नगरपालिकेतील महात्मा फुले मार्केटच्या भाडे निश्चितीबाबत नवीन नियमांनुसार तातडीने निर्णय घेण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. या बैठकीला विविध विभागांचे प्रांताधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी आणि संबंधित गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या