हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
B1न्यूज मराठी नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर, दि.११ : महाराष्ट्र राज्य सहकारी पाणन महासंघ, मुंबई तसेच राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (NCCF) यांच्या संयुक्त विद्यमाने हंगाम २०२५-२६ साठी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार हरभरा खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी व खरेदी प्रक्रिया दि. १ मार्च २०२६ पासून सुरू झाली आहे.
या योजनेअंतर्गत हरभऱ्याचा हमीभाव ५८७५रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी दि. १ मार्च ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांकडून प्रत्यक्ष खरेदी दि. १ मार्च ते २९ एप्रिल २०२६ या कालावधीत करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी NCCF कार्यालयाने ९ खरेदी केंद्रांना मंजुरी दिली आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, गंगापूर, वैजापूर, खुलताबाद, कन्नड, सोयगाव, सिल्लोड, फुलंब्री आणि पैठण या तालुक्यांचा समावेश आहे.
हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी निर्धारित कालावधीत ऑनलाइन नोंदणी करून हमीभावाने खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी व्ही.यु. राठोड यांनी केले आहे.





