खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नातून माचनूरच्या प्राचीन श्री सिद्धेश्वर मंदिराच्या संवर्धनासाठी उजनी जल पर्यटन योजनेतून ५.०४ कोटींचा निधी; आज प्रत्यक्ष भेट व पाहणी
B1न्यूज मराठी नेटवर्क
मंगळवेढा : खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नामुळे मंगळवेढा तालुक्यातील माचनूर येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्राचीन श्री सिद्धेश्वर मंदिर यांच्या संवर्धन व विकासासाठी उजनी जल पर्यटन योजनेअंतर्गत ५ कोटी ४ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा नियोजन समितीने या निधीस मान्यता दिली असून, त्यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे. वारसा संवर्धनाच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. दिनांक १७ डिसेंबर २०२५ रोजी खासदार प्रणिती शिंदे यांनी पाठवलेल्या पत्रानुसार या निधीस मंजुरी देण्यात आली.
दरम्यान, मंदिराच्या वारसा संवर्धनासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) मुंबई मंडळाने सिव्हिल डिपॉझिट अंतर्गत सविस्तर संवर्धन प्रस्ताव तयार करून सादर केला आहे. एएसआयकडून संरक्षित स्मारकांचे जतन व संवर्धन केले जाते, तर विकासकामे राज्य शासनाच्या संबंधित विभागामार्फत राबवली जातात. अशा कामांसाठी एएसआयची पूर्वपरवानगी आवश्यक असून, प्रस्तावित विकासामुळे संरक्षित स्मारक अथवा नियमन क्षेत्रावर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही, याची खात्री केल्यानंतरच मंजुरी दिली जाते.
मंदिर परिसरातील विकासकामांसोबतच मूळ मंदिराच्या संरक्षणात्मक दुरुस्ती व संवर्धनासाठी स्वतंत्र निधीची गरज असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. मंजूर निधी एएसआयकडे जमा झाल्यानंतर सक्षम अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली नियमांनुसार संवर्धन व जीर्णोद्धाराची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. राज्य शासनाने विकासकामे हाती घ्यावयाची असल्यास, संबंधित विभागाने एएमएएसआर कायदा व नियमांनुसार सायन (पूर्व), मुंबई येथील प्रादेशिक संचालक—एएसआय (सक्षम प्राधिकरण) यांच्याकडे आवश्यक मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करावा, असे पत्रात नमूद आहे.
दरम्यान, आज खासदार प्रणिती शिंदे यांनी माचनूर येथील श्री सिद्धेश्वर मंदिरास भेट देऊन दर्शन घेतले व मंदिर परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी देवस्थान कमिटीशी चर्चा करून विकासकामांवर काटेकोर निगराणी ठेवून दर्जेदार काम करून घेण्याचे आवाहन केले. तसेच, आणखी काही आवश्यक कामे असल्यास तीही सूचित करण्याचे त्यांनी सांगितले.
या निर्णयामुळे माचनूरच्या ऐतिहासिक श्री सिद्धेश्वर मंदिराच्या जतन व संवर्धनाला नवी गती मिळणार असून, धार्मिक पर्यटनालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे. श्री सिद्धेश्वर देवस्थान कमिटी, ब्रह्मपुरी (माचनूर) तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनी या निर्णयाबद्दल खासदार प्रणिती शिंदे यांचे अभिनंदन करून कृतज्ञता व्यक्त केली. तसेच ब्रम्हपुरीचे सरपंच सौ. स्नेहलता संजय पाटील, संजय पाटील, रणजीत पाटील यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला.
ब्रम्हपूरीचे सरपंच सौ स्नेहलता संजय पाटील, संजय पाटील, मारुती डोके, दिलीप कलबुर्मे, रणजित पाटील, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत साळे, प्रदेश सचिव रवीकरण कोळेकर, शहराध्यक्ष राहुल घुले, सिद्धेश्वर रने, सुनील डोके, पंडीत पाटील, विठ्ठल डोके, आबासाहेब डोके, बबन सरवळे, आबासाहेब शिरसाट, महेश चव्हाण सत्तार इनामदार, प्रशांत पाटील, मनोज माळी, नाथा ऐवळे, दीपक कलबुर्मे, आयेशा शेख, सुनिता अवघडे, अभिमन्यू तात्या बेद्रे, रवींद्र पुजारी, अकबर मुलानी, राजू ठेंगील, संदीप पवार, कल्याण डोके, समाधान डोके, शहाजी कांबळे व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





