राज्यस्तरीय व्यासपीठावर शिक्षकसेवेचा गौरव; बार्शीच्या डॉ. महादेव अशोक ढगे यांना ‘महात्मा ज्योतिराव फुले आदर्श शिक्षक जीवनगौरव पुरस्कार’
B1न्यूज मराठी नेटवर्क
पुणे : शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तनाची चळवळ अधिक बळकट करणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचा गौरव करणारा ‘राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार २०२६’ हा भव्य सोहळा साऊ ज्योती सामाजिक संस्था व श्लोक फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात शिक्षण क्षेत्रातील सातत्यपूर्ण, निष्ठावंत व मूल्याधिष्ठित कार्याची दखल घेत डॉ. महादेव अशोक ढगे, सहाय्यक प्राध्यापक, बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी यांना ‘महात्मा ज्योतिराव फुले आदर्श शिक्षक जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
पुण्यातील गंज पेठ येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात रविवार, ८ फेब्रुवारी २०२६ रोजी हा राज्यस्तरीय सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन सुभेदार महेंद्र गोवर्धन गवई (इंडियन आर्मी) यांच्या हस्ते झाले, तर अध्यक्षस्थानी मा. प्रा. डॉ. शंकर अंदानी होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा. रामजीत (जितू) महादेव गुप्ता (CBI), सिने अभिनेते बाळराजे वाळूंजकर, अभिनेत्री केतकी गावडे यांची उपस्थिती लाभली.
तसेच कार्यक्रमास मार्गदर्शक म्हणून प्रा. शशिकांत वेदशास्त्री शिरोळे, विशेष प्रमुख पाहुणे म्हणून मा. वि. प. देशमुख, मा. संदीप रमेश शर्मा, मा. सौ. संजीवनी सागर हाडके, मा. भगवान उपसर सुर्यवंशी, दीपक नामदेव बडगुजर यांच्यासह शिक्षण, प्रशासन, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या मान्यवरांच्या हस्ते डॉ. महादेव ढगे यांचा शाल, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. सत्कार स्वीकारतानाचा हा क्षण उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य, शैक्षणिक मूल्यांची जोपासना आणि समाजाभिमुख दृष्टिकोन यामुळे डॉ. महादेव ढगे यांचा हा सन्मान शिक्षणक्षेत्रासाठी गौरवाचा मानला जात आहे.
या सोहळ्यात विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करून समाजात सकारात्मक विचारांची जाणीव निर्माण करण्यात आली. राज्याच्या विविध भागांतून शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमात उत्साह, शिस्त व प्रेरणादायी वातावरण अनुभवायला मिळाले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्य आयोजक सचिन हळदे व विकास उबाळे यांनी विशेष परिश्रम घेतले. उत्कृष्ट नियोजन, प्रभावी सादरीकरण व मान्यवरांची उपस्थिती यामुळे हा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रासाठी दिशादर्शक ठरला.




