स्त्री-पुरुष म्हणून नव्हे तर माणूस म्हणून एकमेकांकडे पाहिल्यास सामाजिक परिवर्तन निश्चित घडेल” – खासदार ज्योतीताई वाघमारे
प्रार्थना फाऊंडेशन आयोजित कृतिशील तरुणाई शिबिराचे उद्घाटन
B1न्यूज मराठी नेटवर्क
मोहोळ, अशोक गायकवाड : मोरवंची (ता. मोहोळ) येथील प्रार्थना बालग्राम येथे प्रार्थना फाउंडेशन व सेवादायी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहा दिवसीय “कृतिशील तरुणाई शिबिर 4.0” चे उद्घाटन समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमासाठी राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे, युवा उद्योजक सुहास आदमाने, अन्नछत्र मंडळ अक्कलकोट प्रतिनिधी अभय खोबरे, माविमचे जिल्हाप्रमुख सोमनाथ लामगुंडे तसेच मोरवंची गावातील प्रतिष्ठित नागरिक सूर्यभान धोत्रे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना खासदार ज्योतीताई वाघमारे म्हणाल्या, “स्त्रीला स्त्री म्हणून आणि पुरुषाला पुरुष म्हणून न पाहता जर माणूस म्हणून पाहिले, तर सामाजिक परिवर्तन निश्चित घडेल.” त्यांच्या या विचारांना उपस्थित युवक-युवतींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांनी प्रार्थना फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या बालकाश्रम व वृद्धाश्रम उपक्रमांचे भरभरून कौतुक केले. समाजातील निराधार बालके आणि वृद्धांसाठी सुरू असलेले कार्य हे प्रेरणादायी असून, अशा उपक्रमांची समाजाला मोठी गरज असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.
सहा दिवसीय निवासी स्वरूपाच्या या शिबिरामध्ये युवक-युवतींमध्ये नेतृत्वगुण, सामाजिक जाणीव, संवेदनशीलता आणि व्यक्तिमत्व विकास घडविण्यासाठी विविध अनुभवाधारित उपक्रम, श्रमदान, गटचर्चा, प्रेरणादायी सत्रे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी महाराष्ट्रातील विविध भागांतून युवक-युवती सहभागी झाले आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रार्थना फाउंडेशन, सेवादायी फाउंडेशन तसेच सर्व सेवाधार्यांनी विशेष परिश्रम घेतले.





