महाराष्ट्रसोलापूर

मानवता हाच फुले आणि आंबेडकरांच्या समतेचा मुख्य घटक: डॉ.दुष्यंत कटारे

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

सोलापूर : समता ही केवळ शब्दांची मांडणी नसून ती विचारांची क्रांती आहे. जेव्हा समाजात समतेचा विचार रुजतो, तेव्हाच खर्‍या अर्थाने समाज परिवर्तनाला गती मिळते. आजच्या धावपळीच्या आणि ’आर्टिफिशियल इंटेलिजन्स’च्या युगात तंत्रज्ञान जरी प्रगत झाले असले, तरी महापुरुषांच्या वैचारिक वारशाचे काय, असा प्रश्न निर्माण होतो. अशा काळात मानवतेसाठी महात्मा जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला समतेचा संदेश आणि त्यासाठी सांगितलेला शिक्षणाचा मार्ग हाच मानवतेच्या मुक्तीचा खरा मार्ग आहे, असे प्रतिपादन लातूर येथील कै. व्यंकटराव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दुष्यंत कटारे यांनी केले.5000
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र आणि सामाजिक शास्त्रे संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारतरत्न सामाजिक समता सप्ताहात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. महात्मा जोतीराव फुले यांच्या 200 व्या जयंती निमित्त आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र. कुलसचिव डॉ. अतुल लकडे होते. मंचावर सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे, प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती आणि पुरातत्व शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रभाकर कोळेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे आणि वित्त व लेखा अधिकारी महादेव खराडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
5000
यावेळी डॉ. कटारे म्हणाले की, मानवता हाच समतेचा पाया आहे. जोपर्यंत आपण एकमेकांकडे मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहत नाही, तोपर्यंत सामाजिक समता प्रस्थापित होऊ शकत नाही. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून विषमतेविरुद्ध जो लढा दिला, तोच लढा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून कायदेशीर आणि नैतिक अधिष्ठानावर नेऊन ठेवला. समतेसाठी शिक्षण हा मुक्तीचा मार्ग आहे, यावर भर देताना डॉ. कटारे यांनी स्पष्ट केले की, शिक्षण म्हणजे समतेने जगण्याची दृष्टी मिळवणे होय. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोघांनीही शिक्षणाला वाघिणीचे दूध मानले होते, कारण त्यांना ठाऊक होते की शिक्षणाने गुलामगीरी नष्ठ होऊन समता प्रस्तापीत होते. अध्यक्षीय भाषणात प्र. कुलसचीव डॉ.अतुल लकडे यांनी विद्यापीठ परिसरात अशा वैचारिक कार्यक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले आणि महापुरुषांचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन केले.
500
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. गौतम कांबळे यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी समता सप्ताहाच्या आयोजनामागची भूमिका विषद करताना, विद्यापीठ कशाप्रकारे सामाजिक बांधिलकी जपत आहे, यावर प्रकाश टाकला. डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी मुख्य वक्ते डॉ. दुष्यंत कटारे यांचा परिचय करून दिला आणि त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची माहिती उपस्थितांना दिली. या व्याख्यानासाठी विद्यापीठातील विविध विभागांचे प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी आणि पदव्युत्तर विभागाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सामाजिक शास्त्रे संकुलातील कर्मचार्‍यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे डॉ. ज्ञानेश्वरी हजारे यांनी सूत्रसंचालन केले. तर शेवटी हाजीमलंग शेख यांनी उपस्थित मान्यवर, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले.
50000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button