सरकारी कामात अडथळा केल्याच्या प्रकरणातून आरोपीची निर्दोष मुक्तता
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : राजेंद्र मारुती जगताप याचे विरुद्ध मळेगाव ग्रामपंचायत मधील लिपिकाचे फिर्यादीवरून पांगरी पोलीस ठाणे येथे भा.द.वि. कलम ३५३, ३२३, ५०४, ५०६ या कलमान्वये दिनांक २४/१२/२०१७ रोजी सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी झालेल्या सुनावणीनंतर मा. सत्र न्यायाधीश बार्शी यांनी महत्त्वपूर्ण निकाल देत आरोपीची निर्दोष मुक्तता केली.
फिर्यादी व इतर कर्मचारी गावातील रस्त्यावर गुड मॉर्निंग पथकात काम करत असताना गावातील जगताप हे शौचालयास जाताना आढळून आले म्हणून त्यांना फिर्यादी थांबवुन उघड्यावर शौचालय जाण्यास अडवले असता जगताप यांनी फिर्यादीस अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून धक्काबुक्की करत उचलून आपटले व जीवे मारण्याची धमकी दिली. अशा स्वरूपाची फिर्याद सुरेश कांबळे यांनी पांगरी पोलीस ठाण्यात दिली होती.
फिर्यादी पक्षाने आरोपीविरुद्ध गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. मात्र न्यायालयाने प्रकरणातील संपूर्ण पुरावे साक्षीदारांचे जबाब तपासातील बाबी व नोंदी यांचा सखोल विचार करून आरोपीस सबळ पुराव्या अभावी संशयाचा लाभ देत सदर गुन्ह्यातुन निर्दोष मुक्तता केली.
या प्रकरणांमध्ये आरोपीच्या वतीने ॲड. सुहास कांबळे यांनी प्रभावी युक्तिवाद करून न्यायालयासमोर प्रकरणातील त्रुटी, विसंगती व पुराव्यांचा अभाव स्पष्ट केला. परिणामी बार्शी येथील मे. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश मा. व्ही. एस. मलक्लपट्टे यांनी आरोपीच्या बाजूने निकाल देत निर्दोष मुक्तता केली.




