खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बार्शीत खत-औषध विक्रेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : खरीप हंगाम तोंडावर आला असताना शेतकऱ्यांना खते, बियाणे व औषधांचा वेळेत पुरवठा व्हावा, यासाठी बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे रासायनिक खते, बियाणे व कीटकनाशक विक्रेत्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली. सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.
बैठकीस प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार राजेंद्र राऊत, बाजार समितीचे सभापती विजय गरड, पंचायत समिती सभापती मीनाक्षीताई रोंगे, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. जिल्हा कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे यांनी खतांची उपलब्धता, संतुलित वापर व अतिवापराचे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले यांनी एल निनोची माहिती व उपाययोजना सांगितल्या. सहाय्यक कृषी अधिकारी गणेश पाटील यांनी युरिया-डीएपीला पर्यायी खतांचा प्रचार करण्याची गरज व्यक्त केली.
यावेळी जिल्हा परिषदेचे मोहिम अधिकारी अजय वगरे, सागर बारवकर, कृषी अधिकारी किशोर अंधारे, रवी भोसले, जीवन जगदाळे, सुधीर काशीद तसेच खत विक्रेते असोसिएशनचे दिनेश सुपेकर, उमेश चव्हाण, कपिल मुनोत, संतोष निंबाळकर, उमेश देशमुख, निशांत गडसिंग आदी उपस्थित होते.
बैठकीत खरीपासाठी युरिया, डीएपी, बियाणे व औषधांचा मुबलक साठा ठेवून तुटवडा भासू नये याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले. बोगस बियाणे, मुदतबाह्य औषधे व लिंकिंग करून माल विकणाऱ्या दुकानदारांवर कारवाईचा इशारा देण्यात आला. प्रत्येक दुकानात MRP दरफलक लावणे व GST सह पक्के बिल देणे बंधनकारक करण्यात आले. तालुका कृषी अधिकारी व गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यांनी भरारी पथकामार्फत आठवड्यातून एकदा तपासणी करावी, असे ठरले.
मा. आ. राजेंद्र राऊत म्हणाले, “बार्शी शेतीप्रधान तालुका आहे. बळीराजाला अडचण येऊ नये ही माझी जबाबदारी आहे. विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे.” बैठकीस तालुक्यातील विक्रेते व कृषी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




