भातंबरे (ता. बार्शी) येथे पत्नीवर चारित्र्याच्या संशयावरून SRPF जवानाने केला गोळीबार; एक ठार तर दोघे गंभीर जखमी

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : पत्नीवर चारित्र्याच्या संशयावरून मुंबई येथील ‘एसआरपीएफ’ जवानाने भातंबरे (ता. बार्शी) येथे गोळीबार केल्याची घटना बुधवारी (ता. २०) रात्री घडली आहे. या घटनेत एक ठार झाला आहे. तर दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सोलापूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.नितीन बाबुराव भोसकर (रा.सापनाई तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद) असे गोळीबारात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर बालाजी महात्मे आणि काशिनाथ विश्वनाथ काळे (वय- ३५, धंदा- ड्रायव्हर, रा. सापनई, ता. कळंब, जिल्हा उस्मानाबाद) हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेत दोघांना गोळीबार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती वैराग पोलिसांनी दिली आहे. तसेच आरोपी गुरूबा तुकाराम महात्मे (रा. भातंबरे ता बार्शी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवान गुरुबा व त्याच्या पत्नीचे भांडण झाले होते. ते भांडण मिटविण्यासाठी गुरुबा यांच्या सासरकडील मंडळी सापनाई येथून भातंबरे येथे रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पोचले होते. त्यावेळी काळे यांच्यासह त्यांचे मित्र नितीन भोसकर, जालिंदर काळे सोबत आले होते. त्यावेळी सासू, सासरे, चुलत भाऊ, प्रमोद वाघमोडे यांच्यासह प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती. यावेळी गुरुबा यांच्या मेहुण्याने बहिणीला तुझी बॅग भर आम्ही तुला घेऊन जातो, असे म्हणाला. तेव्हा गुरुबा महात्मे याने त्याच्याजवळील पिस्तूलमधून गोळीबार केला. या गोळीबारात नितीन भोसकर व बालाजी महात्मे यांना गोळी लागून जखमी होऊन खाली पडले. तर काशीनाथ काळे व जालिंदर काळे पळून जात असताना गोळीबार केला, पण गोळी लागली नाही. या गोळीबारात नितीन भोसकर यांचा मृत्यू झाला. तर महात्मे यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथे पाठवण्यात आले.
दरम्यान, वैराग पोलिसांनी आरोपी गुरूबा महात्मे जवान याला अटक केली आहे. त्याच्याकडून पिस्तूल व २६ जिवंत राउंड जप्त केले आहेत. पुढील तपास वैराग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय बहिर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक परजने करीत आहेत.