पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते बार्शी तालुक्यातील विविध विकासकामांचे उद्घाटन; तीर्थक्षेत्र आराखड्यासाठी 286 कोटींचा संकल्प

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : तालुक्यातील विकासकामांना चालना देण्यासाठी राज्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते विविध विकास योजनांचे उद्घाटन व भूमिपूजन सोहळे पार पडले. कांदलगाव येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 14 कोटी 68 लाख रुपयांच्या निधीतून रस्त्याच्या कामांचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात बार्शी शहरातील प्रसिद्ध श्री भगवंत मंदिराच्या भक्तनिवासाचे भूमिपूजनही करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री गोरे यांनी बार्शी तीर्थक्षेत्राच्या आराखड्यासाठी तब्बल 286 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याचा संकल्प केला. श्री भगवंत मंदिर आणि आसपासच्या धार्मिक परिसराचे जतन, विकास आणि वारकऱ्यांसाठी सुविधा यासाठी या निधीचा वापर केला जाणार आहे.
कार्यक्रमास माजी आमदार राजेंद्र राऊत, बार्शी नगरपालिकेचे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण, नगर अभियंता विवेक देशमुख, तसेच विविध विभागांचे अधिकारी, स्थानिक जनप्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक घोषणा करताना पालकमंत्री गोरे यांनी लवकरच उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन दिले. यामुळे बार्शी तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न मार्गी लागेल आणि शेती उत्पादनात वाढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पालकमंत्री गोरे यांनी कांदलगाव येथील नरसिंह मंदिराला तीर्थक्षेत्र आराखड्यात समाविष्ट करण्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद केली जाईल, अशी घोषणाही केली. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील धार्मिक पर्यटनालाही चालना मिळेल, असे मत त्यांनी मांडले.
वारकऱ्यांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत बोलताना पालकमंत्री गोरे म्हणाले, “ज्या पालखीच्या दर्शनासाठी मी कधी काळी धक्का-बुक्की खाल्ली, त्या विठुरायाच्या पालखीची सेवा करण्याची संधी आज मला मिळाली आहे. वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या सुविधांची कमतरता भासू देणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
या विविध योजनांच्या उद्घाटनामुळे बार्शी तालुक्यातील रस्ते, तीर्थक्षेत्र, सिंचन आणि धार्मिक सुविधा यामध्ये लक्षणीय सुधारणा होईल. स्थानिक नागरिकांना यामुळे पायाभूत सुविधा अधिक सक्षमपणे मिळणार असून, विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.