बार्शीत संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांचा भव्य मोर्चा; तहसील कार्यालयासमोर आरोपींच्या पुतळ्याचे दहन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी, दि. ६ मार्च २०२५ : संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ आज बार्शीत प्रचंड जनसमुदाय रस्त्यावर उतरला. शिवसृष्टी येथून निघालेल्या या मोर्चाने संपूर्ण शहर दणाणून सोडले. तहसील कार्यालयासमोर या हत्येतील मुख्य आरोपी वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यासह अन्य आरोपींच्या पुतळ्याचे चपलांनी प्रहार करून दहन करण्यात आले.

सकाळी ११ वाजता शिवसृष्टी येथून मोर्चाला सुरुवात झाली. हातात फलक आणि बॅनर घेतलेल्या नागरिकांनी “संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे!” अशा जोरदार घोषणा दिल्या. या मोर्चात महिलांसह हजारो नागरिक सहभागी झाले होते. मुख्य संशयित वाल्मीक कराड, धनंजय मुंडे, प्रतीक घुले, सुदर्शन घुले आणि सांगळे यांच्यासह आरोपींच्या निषेधार्थ नागरिक आक्रमक झाल्याचे चित्र दिसून आले.

मोर्चा तहसील कार्यालयासमोर पोहोचल्यावर, संतोष देशमुख हत्येतील प्रमुख आरोपींचा एक मोठा पुतळा तयार करण्यात आला. या पुतळ्यावर वाल्मीक कराड, धनंजय मुंडे, प्रतीक घुले, सुदर्शन घुले आणि सांगळे यांचे फोटो लावण्यात आले होते. संतप्त नागरिकांनी त्या पुतळ्यावर जोरदार चपलांनी मारत निषेध केला आणि शेवटी पुतळ्याचे दहन करण्यात आले.

या आंदोलनादरम्यान पुढील मागण्या लावून धरण्यात आल्या –

  1. संपूर्ण कटाची चौकशी करून धनंजय मुंडे यांना सह-आरोपी घोषित करावे.
  2. सर्व आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी.
  3. गुन्हा घडण्याच्या १० दिवसांतील CDR (Call Detail Record) सार्वजनिक करावा.
  4. या प्रकरणाचा तपास सर्वोच्च स्तरावर व्हावा.

यावेळी देशमुख कुटुंबीय आणि आंदोलकांनी तहसीलदारांना निवेदन दिले. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. तहसीलदारांनी यासंदर्भातील मागण्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पोहोचवण्याचे आश्वासन दिले.

बार्शीत आज कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यापारी, सामाजिक संघटना आणि युवकांनी या बंदमध्ये सक्रिय सहभाग घेतला. संपूर्ण बार्शीकर न्यायाच्या मागणीसाठी एकवटले असून, हा संघर्ष अखेरच्या टप्प्यापर्यंत सुरूच राहील, असा निर्धार आंदोलकांनी केला आहे.

बार्शीत संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ आजचे आंदोलन ऐतिहासिक ठरले असून, प्रशासन पुढे काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या