शैक्षणिक प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे मुद्रांक शुल्क माफ !

500 रुपयांची स्टॅम्प ड्यूटी रद्द , महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय
B1न्यूज मराठी नेटवर्क
अमरावती, दि. 05 मार्च : शैक्षणिक कामकाजासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले आहे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला.
या निर्णयाबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांसह कोट्यवधी नागरिकांना दिलासा मिळाला असून विद्यार्थी आणि पालकांवरील आर्थिक ताण आता कमी होणार आहे. कुठल्याही शैक्षणिक कामाकरीता जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रीमिलेयर अथवा राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र तसेच शिक्षणाकरिता महसूल विभागाकडून जी प्रमाणपत्र लागतील त्याला कुठलेही मुद्रांक शुल्क लागणार नाही.
हा निर्णय विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्वपूर्ण आहे. या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात येईल. साधारणतः दहावी बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर हे दाखले मिळवावे लागतात. यासाठी पालकवर्ग तहसील कार्यालयात जाऊन दाखले मिळवतात.
प्रत्येक दाखल्यासाठी 500 रुपये याप्रमाणे सुमारे तीन हजार रुपये यासाठी पालक खर्ची घालतात. नव्या निर्णयामुळे पालकांचा हा आर्थिक भुर्दंड वाचणार आहे. साध्या कागदावर अर्ज लिहून तो सेतू कार्यालयामार्फत तहसील कार्यालयात द्यावा लागेल. त्यानंतर लागलीच दाखले मिळतील.