भरदिवसा घरफोडीने बार्शीत खळबळ; साडेपाच लाखांचा ऐवज लंपास

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : शहरातील बसवेश्वर कॉलनी, वाणी प्लॉट, आगळगाव रोड परिसरात भरदिवसा घरफोडी झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घरातील मंडळी बाहेर असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून सोन्याचे दागिने व रोख रकमेसह तब्बल ५ लाख ५१ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना मंगळवार, ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते दुपारी ३.४० वाजण्याच्या दरम्यान घडली.
याप्रकरणी मंगेश मारुती भडंगे (वय ३३, रा. बसवेश्वर कॉलनी, वाणी प्लॉट, आगळगाव रोड, बार्शी) यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गु.र.नं. ७६६/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३३१(३), ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, चोरट्याने घरात प्रवेश करून सोन्याचे मंगळसूत्र, मणी मंगळसूत्र, तीन सोन्याच्या अंगठ्या, सोन्याचे कानातील फुले तसेच ९० हजार रुपये रोख असा मुद्देमाल चोरून नेला. चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांचे वजन सुमारे ६५.५ ग्रॅम असल्याचे पोलिसांत नोंद करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप आणि पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी परिसरातील परिस्थितीची माहिती घेत चोरीचा तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे बार्शी शहरात दिवसाढवळ्या घरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत. पुढील तपास पोलीस हवालदार साठे करीत आहेत.




