सोजर इंग्लिश स्कूल प्राथमिक विभागाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहाने संपन्न

0

सोजर म्हणजे भारतीय संस्कार जपणारी शाळा – सचिन वायकुळे

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या सोजर इंग्लिश स्कूल, प्राथमिक विभागाचे ३० वे वार्षिक स्नेहसंमेलन यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाले.

या कार्यक्रमाला उद्घाटन समारंभास “दैनिक संचार”चे उप संपादक सचिन वायकुळे, “दैनिक केसरी” चे प्रतिनिधी नंदकुमार माढेकर, पालक प्रतिनिधी डॉ. प्रिया तोरड यांसह संस्था प्रतिनिधी उमाकांत राऊत, मोहन लोहार आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन अणि दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी संस्थेच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

उद्घाटन समारंभापूर्वी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये शाळेच्या वतीने आयोजित केलेल्या विविध उपक्रमांची चित्रफीत प्रदर्शित करण्यात आली. त्यावर भाष्य करताना प्रमुख पाहुण्या डॉ. प्रिया तोरड यांनी आपल्या भाषणात शाळेचा गौरवपूर्ण उल्लेख केला. तर इंग्रजी माध्यमाची शाळा असून सुद्धा भारतीय संस्कृतीचे संस्कार मुलांना सोजर शाळेत दिले जातात. त्यासाठी शिक्षक वृंद घेत असलेली मेहनत अत्यंत कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन सचिन वायकुळे यांनी केले.

प्राथमिक विभागासाठी यावर्षी नव्याने संस्कृत विषय सुरु करण्यात आला. त्या अनुषंगाने संस्कृत शिक्षक प्रसाद सहस्रबुद्धे यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी सादर केलेल्या संस्कृत श्लोक पठणाने विविध गुणदर्शनाच्या कार्यकमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर गणेश वंदना, भारूड, धनगर नृत्य, तांडव नृत्य, देशभक्ती नृत्य, लावणी, रिमिक्स, रेट्रो डान्स, थीम डान्स, राम आयेंगे, आरंभ है प्रचंड यासारखे बहारदार नृत्याविष्कार सादर करण्यात आले. उपस्थित पालकांनी यास उत्स्फूर्त दाद दिली.

कार्यक्रमाच्या मध्यावर बार्शी शहर पोलिस निरीक्षक बालाजी कुकडे साहेब, युवा उद्योजक अर्जुनसिंग बारबोले, संस्था प्रतिनिधी उमाकांत राऊत, मोहन लोहार, संस्थेच्या सचिवा कल्पनाताई बारबोले, संदीप पोळ आणि रिटा नेटके या मुख्याध्यापक द्वयांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये विशेष गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थी तसेच चालू शैक्षणिक वर्षात आयोजित केलेल्या विविध प्रकारच्या स्पर्धेतील विजेते, त्याच बरोबर “स्टुडंट ऑफ द इयर” (संज्योत मुसळे), ” बेस्ट स्पोर्ट पर्सन” (हुजैफ पठाण) अत्यंत मानाचा समजला जाणारा पूर्व प्राथमिक विभागाचा सोजर बेस्ट बेबी (तेजस्वी कानडे) आणि बेस्ट बॉय (वेदांश ठोंगे) या पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले. तर हाऊस ट्रॉफीचे मानकरी ठरलेल्या दिपाली देशमुख, चैताली पुराणिक यांच्या “ब्ल्यू स्टार” या ग्रुपला हाऊस ट्रॉफी देवून गौरवण्यात आले.

पारितोषिक वितरण समारंभाच्या वेळी बोलताना युवा उद्योजक अर्जुनसिंग बारबोले म्हणाले की, मुलांनी आपल्या गुरुंचा, माता-पित्यांचा आदर करावा. तसेच चिकाटीने सतत प्रयत्न केल्यास निश्चित यश मिळते. तसेच यावेळी बार्शी शहर पोलिस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी पालकांशी संवाद साधला. गुन्ह्याचे मूळ हे मोबाईल असून आपल्या मुलांना मोबाईलचा वापर करण्यावर बंधने घाला. नुसता अभ्यासाचा बोजा त्यांच्यावर न टाकता त्यांना मनसोक्त खेळू द्या, असा सल्लाही त्यांनी यावेळी पालकांना दिला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद सहस्रबुद्धे, तुषार गदगी आणि चैताली पुराणिक यांनी केले. तर सोनाली नष्टे यांनी सर्वांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका रिटा नेटके यांच्या मागदर्शनाखाली शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या