‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमात सोलापूर जिल्ह्यातील सर्व धर्मादाय व शासकीय रुग्णालयांनी सक्रिय सहभाग घ्यावा, गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना त्यांच्या परिसरातच मोफत आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्याचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे आवाहन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना त्यांच्या परिसरातच मोफत व दर्जेदार आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमात सोलापूर जिल्ह्यातील सर्व धर्मादाय, शासकीय, महात्मा फुले जन आरोग्य योजना अंगीकृत तसेच मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत च्या रुग्णालयांनी सक्रिय सहभाग घ्यावा. या उपक्रमाच्या माध्यमातून आजारांचे प्राथमिक टप्प्यातच निदान करून आवश्यकतेनुसार रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टर व संबंधित रुग्णालयांकडे पुढील तपासणी आणि उपचारासाठी संदर्भित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित श्री गणेशा आरोग्याच्या या उपक्रमाच्या अनुषंगाने पूर्व तयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राजेंद्र राऊत,धर्मादाय उपायुक्त ईश्वर सूर्यवंशी, डॉ. वैषंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चे अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर, मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष जिल्हाप्रमुख डॉ. अविनाश खांडेकर, डॉ. संतोष आडके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. कुलकर्णी, आयुष्यमान भारत योजनेचे जिल्हा समन्वयक प्रवीण गुंजाळ, यांच्या सह सर्व धर्मादाय रुग्णालयाचे विश्वस्त/प्रतिनिधी उपस्थित होते.

सोलापूर जिल्ह्यातही या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शासकीय व धर्मादाय रुग्णालये, सार्वजनिक गणेश मंडळे, आरोग्य यंत्रणा, सामाजिक संस्था तसेच उपलब्ध असलेल्या इतर संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. शहराबरोबरच जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनाही या आरोग्य तपासणीचा लाभ मिळेल, यासाठी नियोजन करावे, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून हा उपक्रम सोलापूर जिल्ह्यात व्यापक स्वरूपात राबविण्यात येत आहे. यंदा जिल्ह्यात सुमारे एक ते दीड हजार मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करून दोन लाखांहून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सहायता जिल्हा कक्षचे प्रमुख डॉ. अविनाश खांडेकर यांनी दिली. तसेच जिल्ह्यातील महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे 112, मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत ची 28 तर 18 धर्मादाय रुग्णालया च्या माध्यमातून हा उपक्रम संपूर्ण जिल्हाभरात राबविला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.500

विविध गंभीर आजारांची प्राथमिक तपासणी ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमांतर्गत आयोजित आरोग्य शिबिरांमध्ये हृदयरोग, किडनीविकार, कर्करोग, मधुमेह, संसर्गजन्य आजार, मेंदूचे गंभीर आजार, बालरोग यांसह विविध आजारांची प्राथमिक तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीदरम्यान आजाराची लक्षणे आढळल्यास किंवा पुढील तपासणीची आवश्यकता असल्यास संबंधित रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टर तसेच शासकीय, धर्मादाय किंवा अन्य संबंधित रुग्णालयांकडे संदर्भित करण्यात येणार आहे.नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेत नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी. विशेषतः दीर्घकालीन आजारांची लक्षणे असलेल्या नागरिकांनी आरोग्य शिबिरांमध्ये तपासणी करून घ्यावी, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

गणेश मंडळांच्या माध्यमातून आरोग्य जनजागृती
गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी होत असल्याने या माध्यमातून आरोग्य जनजागृती करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळांनी आरोग्य विभागाच्या समन्वयाने आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यासाठी पुढाकार घ्यावा. शिबिरांमध्ये तपासणीबरोबरच विविध आजारांपासून बचाव, निरोगी जीवनशैली, वेळेवर उपचार घेण्याचे महत्त्व आणि शासकीय आरोग्य योजनांची माहिती नागरिकांना देण्यात यावी.

गरजू रुग्णांना पुढील उपचारासाठी योग्य संदर्भ सेवा
आरोग्य तपासणीदरम्यान गंभीर आजाराची शक्यता आढळणाऱ्या रुग्णांना केवळ प्राथमिक तपासणीपुरते मर्यादित न ठेवता त्यांना पुढील तपासणी व उपचारासाठी योग्य रुग्णालयात संदर्भित करण्याची व्यवस्था करावी. धर्मादाय रुग्णालयांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील पात्र व गरजू रुग्णांना उपलब्ध असलेल्या शासकीय आरोग्य योजनांची माहिती देऊन त्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक सहकार्य करावे.

‘श्रीगणेशा आरोग्याचा’ हा उपक्रम मुख्यमंत्री महोदयाच्या संकल्पनेतून तर मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे राज्य प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या पुढाकारातून राबवला जात आहे. केवळ आरोग्य तपासणी शिबिरांपुरता मर्यादित न राहता आजारी व्यक्तीचे वेळेत निदान, योग्य उपचारासाठी संदर्भ सेवा आणि गरजू रुग्णांना आरोग्य योजनांचा लाभ या त्रिसूत्रीवर आधारित असावा, यासाठी जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याची गरज आहे.509

                                                           

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या