गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक, शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे निर्देश

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर, दि. ११ : जिल्ह्यातील गरीब व दुर्बल घटकातील एकही रुग्ण वैद्यकीय उपचारांपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता सर्व धर्मादाय रुग्णालयांनी घ्यावी. तसेच प्रत्येक धर्मादाय रुग्णालयाने रुग्णालयाच्या दर्शनी भागात उपचारांचे डिजिटल दरपत्रक लावणे बंधनकारक असून, त्याचा जिओटॅग अहवाल एका महिन्यात प्रशासनाकडे सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिले.

जिल्हास्तरीय धर्मादाय रुग्णालय देखरेख समितीची बैठक जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झाली. त्यावेळी ते मार्गदर्शन करत होते. बैठकीस धर्मादाय उपायुक्त ईश्वर सूर्यवंशी, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राजेंद्र राऊत, श्री. शहाजी पवार, डॉ. वैषंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर, समिती सदस्य डॉ. संतोष आडके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. कुलकर्णी, आयुष्मान भारत योजनेचे जिल्हा समन्वयक प्रवीण गुंजाळ यांच्यासह जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयांचे विश्वस्त व प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्तिकेयन म्हणाले की, धर्मादाय रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या गरीब व दुर्बल घटकातील रुग्णांना शासनाच्या विविध आरोग्य योजनांची योग्य माहिती मिळणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक रुग्णालयात नियुक्त आरोग्यमित्रांनी गरजू रुग्णांना योजनांची माहिती देऊन त्यांना संबंधित योजनांचा लाभ मिळवून द्यावा.

प्रत्येक रुग्णालयाच्या दर्शनी भागात डिजिटल दरपत्रक लावल्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना उपलब्ध उपचारांचे दर स्पष्टपणे समजतील. त्यामुळे दरपत्रकाची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी. डिजिटल दरपत्रक लावल्याचा जिओटॅग अहवाल संबंधित रुग्णालयांनी एका महिन्याच्या आत प्रशासनाकडे सादर करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

धर्मादाय रुग्णालयांकडे शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांनी सादर केलेली कागदपत्रे वैध आहेत किंवा नाहीत, याची खातरजमा रुग्णालयांनी करावी. रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला तसेच इतर आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन व पडताळणीसाठी जिल्हास्तरावर लवकरच स्वतंत्र सेल स्थापन करण्यात येणार असून, या सेलच्या माध्यमातून आवश्यक माहिती घेता येईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.500धर्मादाय रुग्णालयांची नियमित तपासणी करा आरोग्य विभागाने जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयांची नियमित तपासणी करावी. शासकीय योजनांतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णांना रुग्णालयाकडून योग्य पद्धतीने उपचार मिळत आहेत का, दर्शनी भागात डिजिटल दरपत्रक लावण्यात आले आहे का, आरोग्यमित्र उपलब्ध आहे का, आरोग्यमित्राकडून रुग्णांना योजनांची योग्य माहिती दिली जाते का, तसेच रुग्णालयात आवश्यक वैद्यकीय साहित्य व सुविधा उपलब्ध आहेत का, याची तपासणी करावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दिले.

या बैठकीस संबंधित धर्मादाय रुग्णालयांचे विश्वस्त किंवा सक्षम प्रतिनिधी उपस्थित राहणे अपेक्षित होते. मात्र, बैठकीस अनुपस्थित राहिलेल्या धर्मादाय रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

जिल्ह्यात १८ धर्मादाय रुग्णालये; ३५० खाटा आरक्षित धर्मादाय उप आयुक्त ईश्वर सूर्यवंशी यांनी सांगितले की, सोलापूर जिल्ह्यात एकूण १८ धर्मादाय रुग्णालये असून, शासकीय योजनांच्या लाभार्थी रुग्णांसाठी ३५० खाटा आरक्षित आहेत. राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाच्या शासन निर्णयानुसार या सर्व धर्मादाय रुग्णालयांनी गोरगरीब व गरजू रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांना शासकीय योजनांची योग्य माहिती देणे आवश्यक आहे.

ज्या उद्देशाने शासनाने धर्मादाय रुग्णालयांना मान्यता दिली आहे, त्या उद्देशाची प्रभावी अंमलबजावणी करणे प्रत्येक रुग्णालयाचे कर्तव्य आहे. तसेच ज्या कारणासाठी रुग्णालयांना शासकीय जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे, त्या जागेचा वापर केवळ वैद्यकीय सेवा देण्यासाठीच करण्यात यावा. अन्य व्यावसायिक कारणांसाठी शासकीय जागेचा वापर होणार नाही, याची संबंधितांनी दक्षता घ्यावी, असे सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.

रुग्णालयांनी मासिक अहवाल सादर करावा : आमदार कल्याणशेट्टी

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सर्व धर्मादाय रुग्णालयांनी दर महिन्याला उपचार व शासकीय योजनांच्या लाभार्थी रुग्णांबाबतचा अहवाल सादर करावा, अशी सूचना केली. बैठकीत संबंधित रुग्णालयांचे विश्वस्त व प्रतिनिधींनी आपल्या रुग्णालयातील कामकाजाची सविस्तर माहिती द्यावी. गरीब व गरजू रुग्णांना केवळ कागदपत्रांच्या अडचणींमुळे उपचारापासून वंचित ठेवू नये. अशा रुग्णांना आवश्यक ते उपचार तातडीने उपलब्ध करून द्यावेत, असेही त्यांनी सांगितले.

आमदार राजेंद्र राऊत यांनीही धर्मादाय रुग्णालयांनी रुग्णांना वेळेत आणि कोणतीही तक्रार निर्माण होणार नाही अशा पद्धतीने उपचार उपलब्ध करून द्यावेत. शासकीय आरोग्य योजनांचा लाभ घेण्यास पात्र असलेला एकही रुग्ण या लाभापासून वंचित राहणार नाही, याची रुग्णालयांनी काळजी घ्यावी, असे सांगितले. यावेळी धर्मादाय रुग्णालयाचे विश्वस्त प्रतिनिधी यांनीही शासकीय योजनेचा लाभ रुग्णांना देत असताना येणाऱ्या अडचणी विषयी बैठकीत माहिती दिली.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या