वैराग पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी दोन तासांत सापडली लाखाची रोकड असलेली बॅग

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : वैराग पोलिसांनी काल रात्री हरवलेल्या सुमारे एक लाख रुपये रोख रकमेची बॅग आणि दुकानाच्या चाव्या अवघ्या दोन तासांत शोधून काढून, नागरिकांकडून कौतुकाची थाप मिळवली आहे. वैराग येथील मोहोळ चौकातील व्यावसायिक निरंजन नवीनचंद गांधी यांना ही बॅग परत मिळाली असून, वैराग पोलिसांच्या जलद आणि कार्यक्षमतेचे हे उत्तम उदाहरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल, १९ जुलै रोजी रात्री अकराच्या सुमारास निरंजन गांधी त्यांचे सिमेंटचे दुकान बंद करून, दुकानातील एक लाख रुपये रोख रक्कम असलेली बॅग आणि दुकानाच्या चाव्या घेऊन त्यांचे मित्र अमोल कासार, अमजद शेख आणि अरुण साखरे यांच्यासोबत त्यांच्या जनावरांच्या गोठ्यात चारा-पाण्याची सोय करण्यासाठी बसले होते. त्यावेळी, दुकानातील जमा झालेली रोख रक्कम असलेली बॅग त्यांच्याजवळच होती. मात्र, तिथून निघताना ते ती बॅग तिथेच विसरून गेले.
आज, २० जुलै रोजी सकाळी दुकान उघडण्यासाठी आल्यावर निरंजन गांधी यांना पैसे असलेली बॅग आणि चाव्या आठवल्या. त्यांनी तात्काळ त्या वस्तू शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना त्या मिळून आल्या नाहीत. त्यानंतर त्यांनी वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्याशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच, पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बॅगेचा कसून शोध सुरू केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी केलेल्या या जलद तपासामुळे अवघ्या दोन तासांच्या आत पोलिसांना यश मिळाले. पोलीस हवालदार अमोल मोरे आणि आकाश कांबळे यांनी ती हरवलेली बॅग निरंजन गांधी यांच्या ताब्यात दिली.
वैराग पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाचे पोलीस हवालदार अमोल मोरे, आकाश पवार, गणेश परजणे आणि श्रीमंत कांबळे यांच्या टीमने ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. एक लाख रुपये रोख रक्कम असलेला मुद्देमाल दोन तासांत शोधून परत केल्याने वैराग पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.



