गुळपोळीच्या सुपुत्राची मोठी झेप; नितीन म्हेत्रे यांची मोटार वाहन निरीक्षक (RTO) पदावर पदोन्नती
B1 न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : बार्शी तालुक्यातील गुळपोळी गावाचे सुपुत्र तथा कर्तव्यदक्ष अधिकारी नितीन म्हेत्रे यांची महाराष्ट्र परिवहन विभागात मोटार वाहन निरीक्षक (RTO) – क्लास 1 (कनिष्ठ स्तर) या पदावर पदोन्नती झाली असून त्यांची उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, धाराशिव येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
नितीन म्हेत्रे यांनी महाराष्ट्र परिवहन विभागात गेल्या सहा वर्षांपासून उल्लेखनीय सेवा बजावली आहे. त्यांच्या सेवाकार्याची सुरुवात सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक या पदावरून झाली होती. पहिली नियुक्ती मुंबईतील अंधेरी RTO कार्यालयात झाली होती. आपल्या प्रामाणिक, शिस्तबद्ध आणि कर्तव्यनिष्ठ कामामुळे त्यांनी विभागात वेगळी ओळख निर्माण केली.
त्यांच्या उत्कृष्ट सेवेला मिळालेली ही पदोन्नती गुळपोळी गावासह बार्शी तालुक्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. धाराशिव येथे मोटार वाहन निरीक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतरही ते नागरिकाभिमुख व पारदर्शक प्रशासन देण्याचा प्रयत्न करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
नितीन म्हेत्रे यांच्या पदोन्नतीबद्दल गुळपोळी गावातील ग्रामस्थ, मित्रपरिवार तसेच बार्शी तालुक्यातील विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





