विनयभंगाच्या गुन्ह्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता; बार्शी न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
B1 न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : बार्शी शहर पोलीस ठाण्यात २०१९ मध्ये दाखल झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपी सुरज मोहन कांबळे (रा. सिद्धार्थ नगर, बार्शी) यांची बार्शी येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. हा निर्णय प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी मा. न्यायाधीश श्रीमती पी. व्ही. राऊत यांनी दिला.
बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३४१/२०१९ अन्वये आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४, ३५४-अ आणि ३५४-ड अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी बार्शी न्यायालयात झाली.
प्रकरणात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर आरोपीच्या वतीने अॅड. विवेक गजशिव यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने साक्षीदार तपासले. मात्र, सादर करण्यात आलेला पुरावा आरोपीला दोषी ठरविण्यासाठी पुरेसा नसल्याचा युक्तिवाद अॅड. गजशिव यांनी न्यायालयासमोर मांडला.
सरकारी पक्षाकडून सादर करण्यात आलेल्या साक्षी व पुराव्यांमध्ये आरोपीविरुद्ध दोष सिद्ध करण्यासाठी आवश्यक ठोस व सबळ पुरावे नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. हा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपी सुरज मोहन कांबळे यांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात आरोपीच्या वतीने अॅड. विवेक गजशिव यांनी प्रभावीपणे बाजू मांडत न्यायालयीन कामकाज पूर्ण केले.





