टाकळीवाडी येथे गॅस वाहिनीला गळती, समृद्धी महामार्गावरील वाहतूक वळवली
B1न्यूज मराठी नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्ग लगत असणाऱ्या टाकळीवाडी ता. गंगापूर येथे गेल कंपनीच्या गॅस वाहिनीला गळती लागली असून खबरदारीचा उपाय म्हणून समृद्धी महामार्गावरील साखळी क्रमांक ४४७ ते ४७१ दरम्यानची (२४ किमी अंतर) वाहतूक धुळे -सोलापूर महामार्गावरून वळविण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी कळविले आहे.
आज सायं. ५ वा. सुमारास टाकळी वाडी येथे गेल कंपनीच्या गॅस वाहिनीला गळती लागली. या घटनेची प्रशासनाने तात्काळ दखल घेत, त्वरित उपाययोजना सुरु केल्या. घटनास्थळी तात्काळ गेल कंपनीच्या अधिकाऱ्यांना पाचरण करण्यात आले. तसेच अग्निशमन यंत्रणा सज्ज करण्यात आली.
वाहतूक वळवली
तथापि, खबरदारी म्हणून समृद्धी महामार्गावरील साखळी क्रमांक ४४७ ते ४७१ दरम्यान २४ किमी वरील वाहतूक धुळे- सोलापूर महामार्गावरून वळवण्यात आली आहे. मुंबईकडुन जाणारे वाहने हे हडस पिंपळगाव इंटरचेंज वरून उतरून धुळे सोलापूर महामार्गावर जातील व माळीवाडा येथून पुन्हा समृद्धी महामार्गावर येतील. नागपूर कडुन येणारी वाहने माळीवाडा इंटरचेंज वरून धुळे सोलापूर महामार्गावर येतील व हडस पिपंळगाव येथून पुन्हा समृद्धी महामार्गावर येतील.
रहदारी धुळे सोलापूर महामार्ग वरून वळविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी सांगितले.
दरम्यान गेल कंपनी च्या तज्ज्ञांनी दोन्हीही बाजूकडील व्हॉलव्ह बंद केले असून पाईप लाईन मधील दाब कमी होत आहे. लवकरच रहदारी सुरळीत होईल यासाठी प्रशासन अथक प्रयत्न करीत असून जिल्हाधिकारी व पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेवून आहेत.
अधिक माहिती साठी समृद्धी महामार्ग नियंत्रण कक्ष क्रमांक 1800 233 22 33 व 8181818155 वर संपर्क साधता येईल, असेही कळविण्यात आले आहे.





