जगदाळे मामा हॉस्पिटल मधील “ट्रोमा सेंटर”‘या’ विभागाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार उद्घाटन

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : १ नोव्हेंबर २०२२ येथील कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळातर्फे गोर गरीब रुग्णांना अत्याधुनिक आरोग्य सेवा पुरविण्यासाठी ‘जगदाळे मामा हॉस्पिटल’ सन १९७५ पासून कार्यरत आहे. बार्शीच्या आसपासच्या पाच तालुक्यातून रुग्ण येथे आरोग्य सेवा घेतात. कोरोना काळात तर या हॉस्पिटलने जवळच्या चार जिल्ह्यातील कोविड रुग्णांवर वैद्यकीय उपचार केले होते.येथील डॉक्टर्स व स्टाफने जीवाची पर्वा न करता आरोग्यसेवा दिली होती. या हॉस्पिटलमध्ये ४० कोटी रुपयांचा महत्वाकांक्षी ‘ट्रॉमा’ प्रकल्प संस्थेचे कर्मचारी, सदस्य व लोकसहभागातून पूर्णत्वास येत आहे. या प्रकल्पातील कॅथलॅब व हृदयरोग विभागाचे उद्घाटन दि.०१ ऑक्टोबर २०२२ रोजी जागतिक किर्तीचे हृदय रोग तज्ञ डॉ. विवेक जावळी यांचा शुभहस्ते करण्यात आले आहे.
दि. ०४ नोव्हेंबर २०२२ रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस बार्शीच्या दौऱ्यावर येत आहेत. ते त्यादिवशी जगदाळे मामा हॉस्पिटलच्या ट्रॉमा युनिटची पाहणी करुन त्यातील न्यूरो सर्जरी व पॉली ट्रॉमा विभागाचे उद्घाटन दुपारी ०१.०० वाजता करणार आहेत. त्यानंतर त्यांच्या या सदिच्छा भेटीनिमित्त संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
तेव्हा बार्शीकरांनी या कार्यक्रमास उपस्थित राहाण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष नंदनजी जगदाळे, जनरल सेक्रेटरी पी.टी.पाटील, जॉईंट सेक्रेटरी ए.पी.देबडवार, खजिनदार जयकुमार (बापू) शितोळे, मेडीकल सुपरिटेंडेंट डॉ. आर. व्ही. जगताप यांनी केले आहे.