महाराजस्व समाधान शिबिरात 718 लाभार्थ्यांना विविध दाखल्यांचे वाटप
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून “छत्रपती शिवाजी महाराज अभियान” अंतर्गत महाराजस्व समाधान शिबिर चे आयोजन करण्यात आले. आज दिनांक 29 जुलै 2026 रोजी सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज रंगभवन येथे उत्तर तहसील कार्यालयामार्फत आयोजित या शिबिराचे उद्घाटन मा. आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात कृषी, महसूल, उपप्रादेशिक परिवहन, विद्युत वितरण, सहकार, नगर भूमापन, आरोग्य, एस.टी. इ. विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते.
एकाच छताखाली जनतेला सेवा मिळावी यासाठी आयोजित या शिबिरात एकूण 718 दाखल्यांचे वाटप करण्यात आले. यामध्ये उत्पन्न दाखला, जात प्रमाणपत्र, रेशन कार्ड, आयुष्मान कार्ड यांसारख्या विविध कागदपत्रांचा समावेश होता.
उपस्थित मान्यवर यावेळी माजी महापौर श्रीकांचना यन्नम, महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी देवकर, नगरसेविका सौ. रोहिणी तडवळकर, महिला बालकल्याण सभापती निर्मला जंगम यांच्यासह इतर नगरसेवक उपस्थित होते. प्रशासनाकडून उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदूणे, तहसीलदार निलेश पाटील, तहसीलदार शिल्पा पाटील, तालुका कृषी अधिकारी रामचंद्र माळी तसेच अधिकारी-कर्मचारी आणि मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते.
“जनतेचे समाधान हेच ध्येय” – आमदार देवेंद्र कोठे
यावेळी बोलताना आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, “सामान्य जनतेला शासकीय योजनांचा लाभ तातडीने मिळावा. त्यांची कामे कमी वेळेत व्हावीत आणि आवश्यक दाखले एकाच ठिकाणी मिळावेत यासाठी राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरे घेतली जात आहेत. जनतेला सेवा देणे हीच शासनाची जबाबदारी आहे आणि ती आम्ही पार पाडत आहोत.” कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात तहसीलदार निलेश पाटील यांनी शिबिराचा उद्देश, व्याप्ती आणि लाभार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांबाबत माहिती दिली.





