सोलापुरात गावठी पिस्टलसह साडेपाच लाखांची रोकड जप्त; एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने धडक कारवाई करत एक देशी बनावटीचे गावठी पिस्टल, पाच जिवंत काडतुसे आणि ₹५ लाख ५० हजारांची रोकड असा एकूण ₹५ लाख ८७ हजार ५०० किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून दुसऱ्या संशयिताचा पोलीस शोध घेत आहेत.
पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख व त्यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला १५ जुलै रोजी गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार नितीननगर येथील कोंडयाल शाळेमागील परिसरात एका तरुणाकडे निळ्या रंगाच्या स्पोर्ट्स बॅगमध्ये गावठी पिस्टल असल्याची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला.
रात्री सुमारे ८.१६ वाजता संशयित रोहित रघुनाथ अहिरे (वय २०) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या बॅगेची झडती घेतली असता एक गावठी पिस्टल, पाच जिवंत काडतुसे आणि ₹५.५० लाखांची रोकड आढळून आली. शस्त्र बाळगण्याबाबत परवाना विचारला असता त्याच्याकडे कोणताही वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झाले.
मित्राने ठेवण्यासाठी दिल्याची कबुली प्राथमिक चौकशीत रोहित अहिरे याने जप्त करण्यात आलेली रोकड, गावठी पिस्टल आणि काडतुसे त्याचा मित्र प्रदीप हुसेनी गायकवाड याने काही दिवसांपूर्वी ठेवण्यासाठी दिल्याची कबुली दिली. प्रदीपच्या वडिलांना कर्नाटक पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यात अटक केल्याने घराची झडती होण्याची शक्यता असल्यामुळे हा मुद्देमाल स्वतःकडे ठेवण्यास दिल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
गुन्हा दाखल; एक अटकेत, दुसऱ्याचा शोध या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६७४/२०२६ अन्वये शस्त्र अधिनियम कलम ३ व २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२४ व १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी रोहित अहिरे याला अटक करण्यात आली असून प्रदीप हुसेनी गायकवाड याचा शोध सुरू आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमीची चौकशी पोलिसांच्या तपासात रोहित अहिरे याच्याविरुद्ध सलगर वस्ती व सदर बाजार पोलीस ठाण्यात शरीराविरुद्धचे दोन गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. तसेच फरार आरोपी प्रदीप गायकवाड याचे वडील हुसेनी शिवाजी गायकवाड यांच्याविरुद्ध महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांत मालमत्ता व शरीराविरुद्धचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली असून त्याची पडताळणी सुरू आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. एस. बिराजदार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख व एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.





