सुर्डीतील DCC बँक शस्त्र दरोडा प्रकरणी आरोपीना जामीन
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : तालुक्यातील सुर्डी गावात ०७ मार्च २०२५ रोजी जिल्हा मध्यवर्ती बँकेत झालेल्या शस्त्रसज्ज दरोडा प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तिघांपैकी दोन आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने प्रत्येकी ₹५०,००० च्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. सदर प्रकरणात तीन अज्ञात आरोपींनी बँकेत प्रवेश करून व्यवस्थापकास कोयत्याने मारहाण केली व बंदुकीच्या धाकावर सुमारे ₹१.५ लाखांची रोकड लुटून पळ काढला होता.
घटनेची माहिती मिळताच बार्शी तालुका पोलिसांनी तातडीने कारवाई करून अवघ्या अर्ध्या तासात तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे, वाहन आणि रोकड जप्त करण्यात आली होती.
बार्शी सत्र न्यायालयाने यापूर्वी दोन्ही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर आरोपींच्या वतीने अॅड. योगीराज पुरवंत यांनी उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. सुनावणीदरम्यान फिर्यादीच्या जबाबातील विसंगती, घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांतील त्रुटी, जप्ती पंचनाम्यातील तफावत, तसेच जप्त झालेली रोकड हीच बँकेतून लुटलेली रक्कम असल्याचे ठोस पुरावे नसल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाकडून करण्यात आला. तसेच तपासात इतर संबंधित व्यक्तींची आरोपी म्हणून नोंद नसल्याबाबतही न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने दोन्ही आरोपींना जामीन मंजूर केला. या प्रकरणात आरोपींच्या वतीने अॅड. योगीराज बसवराज पुरवंत, अॅड. शंकर ननवरे आणि अॅड. सचिन किरतुकडे यांनी काम पाहिले.




