माढा न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेतून आरोपीची बार्शी न्यायालयात निर्दोष मुक्तता

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : उपळवटे (ता. माढा) येथे २०१३ मध्ये घडलेल्या मारहाणीच्या प्रकरणात माढा न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेविरोधात दाखल करण्यात आलेल्या अपीलावर बार्शी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी भैरू डांगे यांची निर्दोष मुक्तता केली आहे. सदर प्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. १७३/२०१३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सख्या चुलत भावाच्या शेतात आरोपीची जनावरे गेल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला होता. या प्रकरणाचा खटला चालवून माढा येथील न्यायालयाने २०१९ मध्ये आरोपी भैरू डांगे यांना शिक्षा सुनावली होती.
या निर्णयाविरोधात आरोपीतर्फे ॲड.गणेश हांडे यांनी बार्शी जिल्हा व सत्र न्यायालयात अपील दाखल केले. अपीलच्या सुनावणीदरम्यान ॲड. हांडे यांनी तपासातील अनेक त्रुटी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. जखमी व्यक्तीवर हल्ला करण्यासाठी वापरल्याचे सांगितलेले शस्त्र पोलिसांनी जप्त केले नसल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. तसेच जखमीचा एक्स-रे काढण्यात आला असला तरी त्याची नोंद न्यायालयीन रेकॉर्डवर नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
याशिवाय, एफआयआरमध्ये नमूद केलेल्या वादाच्या कारणाचा पोलिसांनी पुरेसा तपास केला नसल्याचा, खोटे साक्षीदार तयार करण्यात आल्याचा तसेच घटनास्थळ पंचनामाही सिद्ध होत नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला. यासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचे विविध न्यायनिवाडेही न्यायालयासमोर सादर करण्यात आले.ॲड गणेश हांडे यांनी मांडलेले मुद्दे व युक्तिवाद ग्राह्य धरून बार्शी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी भैरू डांगे यांची निर्दोष मुक्तता केली. निर्णयानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना भैरू डांगे यांनी, “सुमारे १४ वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर मला न्याय मिळाला,” अशी भावना व्यक्त केली.




