ढोल-ताशांच्या गजरात महाराष्ट्र विद्यालयात नवीन विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

महाराष्ट्रB1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : १५ जून २०२६ रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र विद्यालयात नवीन विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये आनंद, उत्साह आणि नवचैतन्य निर्माण करणाऱ्या या स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे खजिनदार जयकुमार शितोळे हे होते, तर प्रमुख पाहुण्या म्हणून नगरसेविका कांचनताई मोहिते उपस्थित होत्या. यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका के. डी. धावणे, उपमुख्याध्यापक आर. बी. सपताळे, पर्यवेक्षिका एन. बी. साठे, पर्यवेक्षक के. जी. मदने, प्रा. संजय बागल, पालक प्रतिनिधी गणेश गोडसे यांच्यासह शिक्षक व मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून करण्यात आली.
यावेळी मुख्याध्यापिका के. डी. धावणे यांनी प्रास्ताविकातून विद्यालयातील विविध शैक्षणिक व नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा राबवत असलेल्या उपक्रमांवर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जयकुमार शितोळे यांनी आपल्या मनोगतात विद्यालयाचा सातत्याने वाढत असलेला शैक्षणिक आलेख सांगितला. तसेच विद्यार्थ्यांनी मेहनत, शिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून यश संपादन करावे, असे मार्गदर्शन केले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते काही विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. नवागत विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेला हा स्वागत सोहळा आनंददायी वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पर्यवेक्षक के. जी. मदने सर यांनी केले.



