मालवंडीत अवैध गुटखा विक्रेत्यावर निर्भया पथकाचा छापा; ₹70 हजारांहून अधिकचा प्रतिबंधित साठा जप्त

अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी-करमाळा निर्भया पथकाची संयुक्त कारवाई; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी: (ता. बार्शी) मालवंडी येथे अवैधरीत्या प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूची विक्री करणाऱ्या व्यक्तीच्या घरावर व गोडाऊनवर निर्भया पथक बार्शी व करमाळा यांनी संयुक्तपणे धडक कारवाई करत ₹70,130 किंमतीचा प्रतिबंधित माल जप्त केला. या प्रकरणी मेहबूब जवाहर आतार (वय 34, रा. मालवंडी, ता. बार्शी) याच्याविरुद्ध बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी बार्शी विभागाच्या अतिरिक्त कार्यभारावर असलेल्या श्रीमती अंजना कृष्णा यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने निर्भया पथक बार्शी व करमाळा यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार 4 जून 2026 रोजी दुपारी मालवंडी येथे आरोपीच्या घरावर व गोडाऊनवर छापा टाकण्यात आला.
या कारवाईत विविध प्रकारचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखू असा ₹70,130 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर आरोपीस ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाईसाठी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
या प्रकरणी सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन कार्यालय सोलापूर येथील उत्कर्षा मुकुंद एखंडे यांनी फिर्याद दिली असून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई श्रीमती अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथक करमाळाचे पोहेकॉ मंगेश पवार, पोकॉ संभाजी पवार, पोकॉ गणेश गुटाळ, मपोकॉ विद्या इंगोले तसेच निर्भया पथक बार्शीचे पोहेकॉ बाबासाहेब घाडगे, पोकॉ हनुमंत पाडुळे व चालक पोकॉ भाऊसाहेब महानोर यांनी पार पाडली. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ बाबासाहेब घाडगे करीत आहेत.




