हरित बार्शीकडे आणखी एक पाऊल! जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दुर्गंधीमुक्त नाला सुशोभीकरण व वृक्षारोपण उपक्रम उत्साहात

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित दुर्गंधीमुक्त नाला सुशोभीकरण व वृक्षारोपण कार्यक्रमात उपस्थित मान्यवर, नागरिक व स्वयंसेवक.
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी, दि. ५ जून : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून बार्शी शहर पोलीस ठाणे, बार्शी नगर परिषद, वृक्ष संवर्धन समिती आणि व्ही. के. मार्ट यांच्या संयुक्त विद्यमाने वीर शिरोमणी महाराणा प्रताप शॉपिंग कॉम्प्लेक्स परिसर, लाकूड तळ येथे “दुर्गंधीमुक्त नाला सुशोभीकरण व वृक्षारोपण कार्यक्रम” उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
पर्यावरण संरक्षण, स्वच्छता आणि हरित बार्शीच्या संकल्पनेला अधिक बळकटी देण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमांतर्गत नाल्याची स्वच्छता, सुशोभीकरण तसेच वृक्षारोपण करण्यात आले. परिसरातील नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे होते. यावेळी मधुसूदनजी चांडक, लेखापरीक्षक अतुल गुंडेवार, प्रतीक झंवर आणि युवराज सोपल यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाने वृक्षारोपणासोबत वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन केले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष उमेश काळे, संजय वाघमारे, दीपक म्हेत्रे, बाळू शिंदे आणि समाधान जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच प्रकल्पाचे समन्वयक व स्वामी समर्थ मंदिर, बळेवाडीचे संस्थापक नानासाहेब कदम यांनी कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन करत नियोजनाची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली.
कार्यक्रमास परिसरातील नागरिक, स्वयंसेवक आणि विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. “स्वच्छ नाला – सुंदर परिसर – हरित बार्शी” हा संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.




