“धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची तत्पर कारवाई; हायवेवरून चोरलेल्या मेंढ्या २४ तासांत जप्त”

B1न्यूज मराठी नेटवर्क
धाराशिव : जिल्ह्यातील येरमाळा पोलीस ठाणे हद्दीत हायवेवरून जाणाऱ्या चालत्या ट्रकमधून मेंढ्या चोरीस गेल्याची घटना उघडकीस आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत कारवाई करत चोरीतील मेंढ्या आणि वाहन जप्त केले. या कारवाईमुळे सुमारे ३ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दि. २३ मे २०२६ रोजी पहाटे अज्ञात चोरट्यांनी हायवेवरून जाणाऱ्या ट्रकमधून मेंढ्या चोरी केल्याची घटना घडली होती. या घटनेची माहिती मिळताच रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तपासासाठी रवाना करण्यात आले.
तपासादरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे तेरखेडा येथील लक्ष्मी पारधी पिढी तसेच उमरा पारधी पिढी परिसरातील काही व्यक्तींनी ट्रकमधून मेंढ्या चोरी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा, आरसीपी आणि क्यूआरटी पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला.
कारवाईदरम्यान बाभळीच्या झाडाखाली उभ्या असलेल्या लाल रंगाच्या टमटम वाहनाजवळ काही संशयित इसम दिसून आले. पोलिसांना पाहताच संबंधित व्यक्तींनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला, मात्र ते हाती लागले नाहीत.
यानंतर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये चोरीस गेलेल्या मेंढ्या आढळून आल्या. फिर्यादीकडून खात्री करून घेतल्यानंतर संबंधित मेंढ्या चोरीतीलच असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी मेंढ्या आणि टमटम वाहन असा एकूण ३ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पुढील कारवाईसाठी येरमाळा पोलीस ठाणे येथे जमा केला आहे. ही कारवाई विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पुढील तपास सुरू आहे.




